न.प.च्या बेपर्वा धोरणामुळे वृध्द दिव्यांगांना हेलपाटे
मोर्शी / प्रतिनिधी
वृद्ध महिला व आंधळा दिव्यांग व्यक्तीच्या घराजवळ शेणखताचा उकिरडा व टीनपत्रे लावून अतिक्रमण केल्या जात असल्याच्या निषेधार्थ २२ जानेवारीपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होणार आहे. अशा आशयाचे एक लेखी निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना देण्यात आले.शहरातील रामजीबाबा मंदिरालगत वार्ड क्र. ३ येथे किशोर प्रकाशराव पाटील व त्यांची वृद्ध आई श्रीमती ललिताबाई प्रकाशराव पाटील हे दोघे त्यांच्या स्वतःच्या घरात राहतात. त्यांच्या घराशेजारी १५ फुटांचा रस्ता आहे; परंतु सन २०१९ पासून या रस्त्यावर विजय गोहाड व सुखदेवराव वानखडे यांनी शेणखताचा उकिरडा व टीनपत्रे लावून तो रस्ता बळजबरीने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचे बांधकाम सुरू केले आहे.गोहाड यांनी शेणाचा उकिरडा टाकून तर क्षीरसागर यांनी टीनपत्रे लावून अतिक्रमण केले असून रस्ता बंद केल्यामुळे जाण्या-येण्यास अडथळा निर्माण झाला आहे.आजपासून उपोषण
जाण्या-येण्याच्या रस्त्यावर शेणाचा उकिरडा टाकल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून विविध आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. किशोर पाटील हे शंभर टक्के आंधळे अपंग असून त्यांना केवळ वृद्ध आई आहे.त्यांच्या नावाने पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले असून त्यांना बांधकाम करण्याकरिता अडचण निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकरणी किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री,नगरविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य त्यांच्याकडे सन २०१९ पासून तक्रार दाखल करून सतत पाठपुरावा करीत आहे.मुख्याधिकारी नगरपरिषद मोर्शी यांनासुद्धा वारंवार कळविण्यात आले; मात्र प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात न आल्यामुळे आज २२ जानेवारीपासून त्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. १०० टक्के आंधळा अपंग व्यक्ती व वृद्ध महिला यांची सर्वस्वी जबाबदारी शासन- प्रशासनाची राहणार आहे.