शिंदे आणि वनगा यांच्यात दिलजमाई
पालघर / नवप्रहार डेस्क
राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. राजकारणात आजचा शत्रु उद्याचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू बनू शकतो. तिकीट वरून देखील नाराजी आणि दिलजमाई हा प्रकार होत असतो. शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा यांच्या बाबतीतही तेच घडले होते. त्यामुळे ते कमालीचे नाराज झाले होते. ते आणि त्यांचे कुटुंब बेपत्ता देखील झाले होते. पण आज (दि. 13) तेच वणगा शिंदे यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर दिसल्याने त्यांच्या नाराजी नात्यावर पडदा पडल्याचे बोलल्या जात आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपामुळे अनेक इच्छुकांची नाराजी ओढावली. काहींची नाराजी दूर करण्यात यश आलं तर काहींनी थेट बंडखोरी केली.याचदरम्यान,एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट कापल्यामुळे एक नाव चांगलंच चर्चेत आलं होतं.
पालघर विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी महानाराजीनाट्य रंगलं होतं.विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे ओक्साबोक्शी रडताना व्हिडिओ व्हायरल झाला होता.तसेच या व्हिडिओतून त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करतानाच उद्धव ठाकरेंना देव म्हटलं होतं.वनगा यांच्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
आता याच श्रीनिवास वनगांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे.त्यांनी बुधवारी शिंदे पालघरच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं.तसंच महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी शिंदेंनी घेतलेल्या प्रचारसभेच्या स्टेजवरही ते हजर होते. श्रीनिवास वनगा हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत दिसून आल्यामुळे त्यांच्या नाराजीनाट्यावर आता पडदा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना श्रीनिवास वनगा यांना मोठा शब्द दिला. ते म्हणाले, मी लोकसभेमध्ये काहींना उमेदवारी देऊ शकलो नाही.परंतु, त्यांना विधानसभेत ताबडतोब उमेदवारी दिली.आम्ही उठाव केला तेव्हा श्रीनिवास माझ्यासोबत होता.आताही घरचा कार्यक्रम सोडून तो आमच्यासोबत आला.तो गावित यांच्यासाठी येथे उपस्थित आहे.त्याचं चांगलं होईल, श्रीनिवासला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज नाही, अशी ग्वाही शिंदेंनी भरसभेत दिली.
वनगा यांचा यू-टर्न
विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यानं प्रचंड दुखावले गेलेले श्रीनिवास वनगा यांनी हे जवळपास 36 तास बेपत्ता होते.घरी परतल्यानंतर ते म्हणाले,’मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घात केला नाही,तर फक्त साहेबांना मिस गाईड करणाऱ्यांनी घात केला.माझ्याबद्दल साहेबांना मिस गाईड करण्यात आलं.पण आता आपण ठाकरे गटाच्या संपर्कात नसून फक्त एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहोत.
पण आता आपण उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात नसून फक्त एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहोत. मी आश्वासनावर राहणार नाही. मला जे काम दिलं ते करणार आहे.आमचं घराणं महायुतीत आहे.आपण निष्ठावंत असून भाजप आणि शिवसेना व्यतिरिक्त मी कोणत्याही पक्षाचं काम करू शकत नाही, असंही वनगा यांनी स्पष्ट केलं आहे.
…आणि माझा घात झाला!
एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारली.त्या मतदारसंघात भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज होते. त्यांचा रडतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.त्यात त्यांनी उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला’, असं धक्कादायक विधान केलं होतं.