मुख्याध्यापकांकडून अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे

गडचिरोली / नवप्रहार ब्युरो
भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीनी शाळेत जायला नकार दिल्यावर हा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारी वरून लाहेरी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र उष्टूजी गव्हारे (वय ४६, रा. भामरागड) या मुख्याध्यापकास अटक केली आहे.
संबंधित गाव आदिवासीबहुल असून, तेथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवीपर्यंतची शाळा आहे. शाळेत पूर्वी रवींद्र गव्हारे आणि अन्य एक शिक्षक कार्यरत होते. परंतु दुसऱ्या शिक्षकास अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे हा तेथे एकटाच कार्यरत होता.
५ मार्चला सकाळी शाळेची वेळ झाली. गावातील एका महिलेने तिची ९ वर्षीय मुलगी आणि तिच्याकडेच राहणाऱ्या नणंदेच्या ११ वर्षीय मुलीस शाळेत जाण्याच्या तयारीविषयी विचारणा केली. परंतु दोघींनीही शाळेत जाण्यास नकार दिला. दोघींनाही विश्वासात घेऊन कारण विचारले असता, मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे हा आपल्या कार्यालयात रजिस्ट्रर आणण्याच्या बहाण्याने बोलावून अश्लिल कृत्य करायला लावतो. शिवाय कुणाला सांगितले तर जिवे मारेन, अशी धमकीही देत असल्याचे दोघींनी सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने शाळेतील अन्य दोन विद्यार्थिनींकडे विचारणा केली असता त्यांनीही मुख्याध्यापक गव्हारे याने आपणाशी असेच कृत्य केल्याचे सांगितले. मागील आठवडाभरापासून हा प्रकार सुरु होता.
यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी लाहेरी उपपोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी पीडित मुलगी व कुटुंबीयांचे बयाण नोंदवून आरोपी रवींद्र गव्हारे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन सरकटे पुढील तपास करीत आहेत.
तीन दिवसांपूर्वीच गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथे युवतीवर एका नराधमाने अतिप्रसंग केला होता. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच भामरागड तालुक्यात चक्क मुख्याध्यापकानेच अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.