हत्या करून मृतदेह ड्रम मध्ये लपवला पण …..
दोन वर्षानंतर झाला हत्येचा उलगडा
आरोपीने 1300 क्राईम पेट्रोल चे ईपिसोड पाहून रचला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन
उदयपूर / नवप्रहार वृत्तसेवा
माणसाची एक चूक कशी माणसाच्या गैरकृत्याचा इतिहास उघडण्यास कारणीभूत ठरते याचे मूर्तिमंत उदाहरण राजस्थान च्या उदयपूर येथे पाहायला मिळाले आहे.एका तरुणाने प्रेयसी ची हत्या करून मृतदेह ड्रम मध्ये भरून त्याला सीमेंट ने पॅक करून ठेवले. पण काही काळाने ड्रम चा छिद्र पडल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली. घरमालकाने त्याला याबद्दल हटकले असता त्याने त्याला हकीकत सांगितली. आणि त्याला आपल्या प्लॅन मध्ये सामावून घेतले.मुख्य म्हणजे त्याने यासाठी क्राईम पेट्रोल चे 1300 एपिसोड पाहिले होते. एका दुसऱ्या प्रकरणात आरोपी पकडल्या गेल्यावर त्या हत्येचा उहापोह झाला.
ह्या गुन्ह्याची सुरुवात 2019 मध्ये झाली. राहुल राज चतुर्वेदी असं आरोपीचं नाव असून तो एका मंदिरात पुजारी असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याच वर्षी तो धानमंडी येथील रहिवासी असलेल्या भानुप्रिया हिच्यासोबत राहायला लागला. 2021 मध्ये दोघांच्यातील वाद विकोपाला गेला, यातून त्याने भानुप्रियाची हत्या केली. मात्र, हत्येनंतर आजपर्यंत तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. आणि कदाचित यापुढेही आला नसता.
त्याचं झालं असं की राहुल राजला प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक केली. पोलीस तपासादरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्यावर संशय बळावला. यातूनच पोलिसांनी भानुप्रिया खून प्रकरणाची चौकशी केली. मात्र, इथेही तो बधला नाही. अखेरीस पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.
‘शरीराचे तुकडे करून जाळले’
उदयपूरचे एसपी भुवन भूषण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भांडणानंतर भानुप्रियाची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे भयावह षडयंत्र त्याने रचले. त्याने 1300 हून अधिकवेळा क्राईम पेट्रोल या मालिकेचे एपिसोड पाहिले. त्यानंतर मृतदेह लोखंडी ड्रममध्ये ठेवून वरुन सिमेंटने लेपून घेतलं.
काही काळापूर्वी तो काही कामानिमित्त बाहेर गेला असताना ड्रमला छिद्र पडले. त्यामुळे खोलीत दुर्गंधी येऊ लागली. यावर घरमालकाने त्याला बोलावून साफसफाई करण्यास सांगितले. यावेळी त्याने घरमालकाला संपूर्ण हकीकत सांगितली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर त्याला मालकाचाही पाठिंबा मिळाला. दोघांनी मिळून भानुप्रियाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जाळले. त्यानंतर इतर पुराव्यांसह राख राजसमंदच्या बनास नदीत टाकण्यात आली.