राजकिय

शिंदेंचा काँग्रेस आणि ठाकरे गटाला दे धक्का

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो

 विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मध्य नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडल्याने नाराज असलेल्या काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. याच ठिकाणी हा पक्षप्रवेश करून शिंदेनी काँग्रेसला धक्का दिला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळून त्यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांना चांगली टक्कर दिली होती. या निवडणुकीत हेमलता पाटील यांना उमेदवारी न देऊन ती जागा ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांना दिली असल्याने त्या नाराज होत्या. तसेच ऐनवेळी ठाकरे गटाने एबी फॉर्म देऊनही आपली उमेदवारी हिसकावून घेतली असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

हेमलता पाटील या १९९६ मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून प्रदेश प्रवक्ता म्हणून कार्यरत होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांना शब्द देऊनही ती जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडल्याने त्या नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्या कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. अखेरीस त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदेंची काम करण्याची पद्धत ही विलासराव देशमुख यांच्यासारखी!

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हेमलता पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासारखी आहे. शिंदे यांच्याकडून मी कोणत्याही पदासाठी आश्वासन घेतले नाही. काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये आजपर्यंत काम केले आहे. शिंदे यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर मला विलासराव देशमुख यांची आठवण येते. एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात आणि आता त्याच व्यक्तीची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं.

नाशिकमध्ये पुन्हा शिंदेंचा ठाकरेंना दे धक्का

नाशिकच्या माजी उपमहापौर तसेच सहा वेळा नगरसेवक राहिलेल्या ठाकरे गटाच्या रंजना बोराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात असून, अजून कोणकोणते ऑपरेशन केले जातील याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close