हरवलेली पर्स 63 वर्षांनी सापडली ; वाचा काय काय सापडले पर्स मध्ये
जगात अनेक घटना अश्या घडतात की त्यावर हसावे की रडावे किंवा कोणती प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. अशीच एक घटना घडली आहे. एका मुलीची शाळेच्या वेळी हरवलेली पर्स तब्बल 63 वर्षांनी सापडली.
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी, वस्तू हरवतात. खरंतर त्यातील अनेक वस्तू या आपल्या फारच जवळच्या असतात किंवा अत्यंत महत्त्वाच्या आणि कामाच्या असतात. त्या हरवल्या की आपला जीव कासावीस झाल्याशिवाय राहत नाही.
काही हरवलेल्या वस्तू आपल्याला लगेचच मिळतात परंतु काही गोष्टी या आपल्याला कधीच परत मिळत नाही. आपण त्या वस्तूंच्या आठवणीत रमतो हे मात्र खरं. आपल्या हरवलेल्या गोष्टी कुठे बरं जात असतील? एक गंमत म्हणून आपण याचा विचार करतोही. परंतु जेव्हा एखादी गोष्ट कितीही शोधलं तरीही सापडत नाही तेव्हा मात्र कालांतराने आपण त्याबद्दल विसरूनही जातो. परंतु अचानक तिची गोष्ट आपल्या समोर आली तर? किंवा तीच हरवलेली गोष्ट ही दुसऱ्यांना मिळाली तर?
तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु अशीच एक गोष्ट तब्बल 63 वर्षांनी मिळाली आहे. होय, याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओनुसार, 1957 साली एका विद्यार्थीनीची हरवलेली पर्स ही तब्बल 63 वर्षांनी मिळाली आहे. या पर्समध्ये नक्की काय होतं? हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हालाही नक्कीच लागून राहिली असलेच.
1957 साली हरवलेली एका विद्यार्थीनीची पर्स ही तब्बल 63 वर्षांनंतर सापडली आहे. सध्या या व्हिडीओ हा इन्स्टाग्रामवर व्हायरल होताना दिसतो आहे. @insidehistory या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता की, एका शाळेच्या लॉकरच्या आणि भिंतीच्या मध्ये एक मोठी पर्स दिसते आहे. ही पर्स उघडून पाहिली असता 63 वर्षे जूनी आहे असे कळते आहे. CNN च्या 2020 च्या अहवालानुसार, ही घटना 2019 ची आहे. नॉर्थ कँटन मिडल स्कूल, ओहियो, युएसए मधील एका शाळेत ही पर्स सापडली. ही घटना 30 मे 2019 रोजी घडली आहे
समोर आलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये या पर्सचा शोध लागला. पॅटी रमफोला (Patti Rumfola) या विद्यार्थीनीची लाल रंगाची पर्स ही शाळेत हरवली होती. शाळेची देखभाल करणाऱ्या एका व्यक्तीला ही पर्स शाळेचे लॉकर्स दुरूस्त करत असताना सापडली. ही पर्स लॉकर आणि भिंतीमध्ये अडकली होती. त्यातून या पर्समधून अनेक गोष्टी या बाहेर आल्या. यात कंगवा, मेकअपच्या वस्तू, पावडर, लिपस्टिक, स्थानिक सार्वजनिक वाचनालयाचे सदस्यत्व कार्ड, कुटुंबीय आणि मित्र परिवाराचे कृष्णधवल छायाचित्रे, 26 सेंट, 1956 च्या शालेय फुटबॉल खेळाचे वेळापत्रक देखील होते. या विद्यार्थीनीने 1960 साली तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि नंतर ती शिक्षिका झाली आणि मग तिचे 1980 मध्ये लग्न झाले.