हर हर महादेव, बम बम भोले च्या जयघोषाने दुमदुमली अनेक शिव मंदिरे

विदर्भ चमू
आज महाशिवरात्री असल्याने सर्वच शिव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे. विदर्भातील अनेक शिव मंदिरात आज भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. परंपरे नुसार प्रत्येक मंदिरात प्रसाद वितरित होत आहे.चला तर जाणून घेऊ या कुठल्या शिव मंदिरात कुठला प्रसाद आला वाटण्यात.
विदर्भातील अनेक शिवमंदिरात भाविकांच्या गर्दीने गजबजली असल्याचे चित्र आहे. त्यात कुठे तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ प्रसाद म्हणून वितरित करण्यात येत आहे. तर कुठे महाशिवरात्रीच्या पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे.
तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ प्रसाद
बुलढाणा जिल्ह्यातील 350 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या पळशी झाशी येथील श्री शंकर गिरी महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी झाशी गावातील शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. विशेष म्हणजे या ठिकाणी महाशिवरात्रीचा प्रसाद म्हणून तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ तयार करण्यात येतो. परिसरात या महारोठाला फार मोठे महत्त्व असून या महारोठ तयार करण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झालेली आहे.
साडेतीनशे वर्षांपूर्वी शंकरगिरी महाराज तपश्चर्य करत असताना त्यांना अनुभूती झाली की, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी झाशी गावात एक स्वयंभू शिवलिंग आहे . साडेतीनशे वर्षांपूर्वी शंकरगिरी महाराज हिमालयातून या गावात आलेत आणि त्यांनी या स्वयंभू पिंडीचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी मंदिर बांधले. तेव्हापासून या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या महारोठाची राज्यभर चर्चा असून भाविक या महारोठाचा प्रसाद वर्षभर आपल्या घरात ठेवतात आणि अनेक व्याधींवर हा प्रसाद औषध म्हणून त्याचा वापर करत असल्याची देखील भाविकांची श्रद्धा आहे.
गोंदियातील 270 वर्ष पुरातन पंचमुखी शिव मंदिर
गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथे 270 वर्ष पुरातन काळातील पंचमुखी शिव मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त या नागराधाम मंदिरात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत असतात. महाशिरात्रीच्या पूर्वसंध्येपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्याचे बघायला मिळाले. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, या मंदिराची बांधकाम शैली आणि भाविकांची असलेली अपार श्रद्धेमुळे इतर वेळी देखील भविकांचा कायम राबता असतो.
अमरावतीच्या गडगडेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी
महाशिवरात्रीनिमित्त अमरावती शहरातील अतिशय पुरातन असलेल्या गडगडेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या मंदिराला 250 वर्ष पुरातन इतिहास लाभला असून शहरातील तमाम नागरिकांचे ते श्रद्धास्थान आहे. विशेष म्हणजे याठिकाणी वर्षभर दररोज सकाळी महाअभिषेक होतो आणि महाशिवरात्री निमित्ताने पहाटे 3 ला पूजा झाल्यानंतर विशेष अभिषेक करण्यात येतो. आज पहाटेपासून मंदिरात दर्शनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे.
विदर्भाची काशी असलेल्या कोटेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या वर्धा नदीच्या तीरावर वसलेले कोटेश्वर हे हेमाडपंथी शिव मंदिर आहे. विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या या कोटेश्वर शिव मंदिरात काल मध्यरात्री पासूनच भक्तांची मोठी गर्दी जमली आहे. कोटेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेला देखील प्रारंभ झाला असून येथील उत्तरवाहिनी नदी आणि निसर्गरम्य वातावरणात भक्त येथे पोहचत कोटेश्वर महादेवाचे दर्शन घेत आहे. कोटी यज्ञ करून पवित्र झालेली भूमी अशी या कोटेश्वर महादेव मंदिराची आख्यायिका आहे.
पाच नद्यांच्या संगमावर वसलेलं आंभोरा येथील शिवमंदिरात
भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा येथील वैनगंगा नदीसह पाच नद्यांच्या संगमावरील अंभोरा येथील टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे. चैतन्येश्वराच्या चैतन्यमयी वातावरणात आंभोरा येथील शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रिघ लागल्याचे बघायला मिळत आहे.