ज्ञानवापी मशिदीत हिंदूंना पूजा करता येणार – कोर्ट
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
ज्ञानवापी मशिदीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मशिदीच्या तळघरात पूजा करण्यासाठी वाराणसी कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे हिंदू पक्षकारांना दिलासा मिळाला आहे. ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तैखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे.
वाराणसी कोर्टाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या सात दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना हिंदू पक्षकारांचे वकील विष्णु शंकर जैन म्हणाले की, हिंदू पक्षकाराला ‘व्यास का तैखाना’ येथे पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सात दिवसांत व्यवस्था करुन द्यावी लागेल. त्यामुळे आता सर्वांना पूजा करण्याचा अधिकार मिळेल.
मागील आठवड्यात कोर्टाच्या आदेशानुसार ‘व्यास का तैखाना’ची चावी डीएमनी आपल्या ताब्यात घेतली होती. हिंदू पक्षाचे वकील आजची घटना राममंदिराचे दरवाजे खुले करण्याच्या घटनेसारखी मानत आहेत. या तळघरात १९९३ पूर्वी पूजा व्हायची असं सांगितलं जातं. अयोध्येतील बाबरी पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारी बाजूंना प्रशासनाने लोखंडाचे बॅरिकेंडिग लावले होते. त्यामुळे या तळघरात जाणे शक्य नव्हते.
माहितीनुसार, सोमनाथ व्यास यांचा परिवार १९९३ पूर्वी तळघरात नियमित पूजा करायचा. पूजा पुन्हा सुरु व्हावी यासाठी व्यास यांचे नातू शैलेंद्र व्यास यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं की, १९९३ पासून तळघरात पूजा बंद झाली आहे. सध्या हे तळघर अंजुमन इंतजामिया मसाजिद कमिटीकडे आहे. आता या तळघरात पुन्हा पूजा सुरु होईल. कोर्टाने १७ जानेवारीला तळघराची चावी आपल्या ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.