एप्रिल 2024 मध्ये झालेल्या गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
मोर्शी (ओंकार काळे ):- एप्रिल 2024 मध्ये मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपीटमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादित प्रती हेक्टर 36 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी आणि जाणीवपूर्वक चुकीचा अहवाल पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे
एप्रिल 2024 मध्ये मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाचे आदेशानुसार तालुका कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी आणि तहसीलदार मोर्शी यांना अंबाडा व हिवरखेड महसुली मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पूर्ण नुकसान भरपाईचे एकत्रितपणे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तहसीलदार मोर्शी, खंडविकास अधिकारी मोर्शी आणि तालुका कृषी अधिकारी मोर्शी या तीनही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादे ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेचे नुकसानीचे पंचनामे केले होते.पूर्ण क्षेत्राचे नुकसानीचे पंचनामे न करता 40 ते 45 टक्के नुकसान झाल्याचे पंचनामे शासनाकडे पाठविले होते होते.
त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान करणाऱ्या तहसीलदार मोर्शी, तालुका कृषी अधिकारी मोर्शी आणि खंड विकास अधिकारी मोर्शी यांचे वर प्रशासकीय कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिहेक्टरी 36000 रुपये, 3 हेक्टर पर्यंतचे मर्यादित नुकसानीचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदिप पवार महसूल यांना देण्यात आले आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवेदन देताना दत्तात्रेय पाटील, निलेश शिरभाते, गजानन मधापुरे, सुशील धोटे, चेतन घाटोळे, अशोक ठाकरे, अजय गुडघे,आप्पा गेडाम अजय आगरकर केशव गवळी, विजय चिखले, प्रशांत राऊत, हिरूसिंग मोहने, अजय राऊत, बाबाराव जाधव, दिनूभाऊ चोबितकर, रवींद्र मोरे, इत्यादी शेतकरी हजर होते.