भ्रष्ट्राचार

घाटंजीत बहुप्रतिक्षित रस्त्याचे काम वादाच्या भोवऱ्यात!

Spread the love

 

अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त

घाटंजी ता प्रतिनिधि -सचिन कर्णेवार

घाटंजी : शहरातील शिवाजी चौक ते अंजी जाणाऱ्या नाल्यापर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत होता. खड्डेमय रस्ता आणि उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा मागणी करूनही कामाला सुरुवात होत नव्हती. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर या रस्त्याचे काम सुरू झाले आणि नागरिकांनी “आता दिलासा मिळेल” असे म्हणून समाधान व्यक्त केले. मात्र काही दिवसांतच हा दिलासा अल्पकाळ टिकला. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील मतभेद तसेच वाळू टाकण्यावरून झालेल्या वादांमुळे काम ठप्प झाले असून रस्ता पुन्हा खोदकाम अवस्थेत अडकला आहे.
सुमारे २०० मीटर लांबी आणि ६ फुट रुंदीच्या, तब्बल ३० लाख रुपये खर्चाच्या या कामाचा शुभारंभ उत्साहात झाला होता. दर्जेदार रस्ता तयार करून काही आठवड्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला बांधकाम विभागाकडून काम समाधानकारकरीत्या सुरू झाले होते. मात्र, कामासाठी लागणाऱ्या वाळूच्या वाहतुकीबाबत ठेकेदार आणि वाळू पुरवठादार यांच्यात वाद निर्माण झाल्याने काम अर्धवट थांबले. या वादामुळे रस्त्याचे बांधकाम थांबून काही दिवसांतच रस्ता पुन्हा खोदकाम अवस्थेत दिसू लागला आहे.
अर्धवट कामामुळे परिसरात धूळ, चिखल आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शिवाजी चौक ते आनंदनगर, वसंतनगर, तसेच अंजी नृसिंह देवस्थान आणि या मार्गावरून जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना या रस्त्यामुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहनधारकांना इतरत्र वळसा घालून प्रवास करावा लागत असून, त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.
पादचाऱ्यांना विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून जाणे धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि पाणी साचल्याने घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रस्त्यालगतच्या शाळा परिसरातील पालकांनीही या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

या भागातील व्यापाऱ्यांचेही हाल झाले आहेत. दुकानांसमोर पडलेल्या खडी, माती आणि धुळीमुळे ग्राहकांची वर्दळ कमी झाली असून व्यवसायावर परिणाम होत आहे.

शहरातील महत्त्वाच्या भागातील हा रस्ता अर्धवट स्थितीत सोडल्याने घाटंजी नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी तातडीने हे काम पूर्ण करून सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. स्थानिकांनी संबंधित प्रशासन आणि बांधकाम विभागाकडे लक्ष देऊन कामाला पुन्हा गती देण्याचे आवाहन केले आहे.

 

रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे. प्रशासन आणि ठेकेदारांनी आपले वाद बाजूला ठेवून नागरिकांच्या सोयीसाठी कामाला गती द्यावी. आम्हाला राजकारण नको, फक्त चांगला आणि सुरक्षित रस्ता हवा आहे. आपसी कलहात नागरिकांना अडकवू नका.
– अंकुश कलोडे, नागरिक

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close