क्राइम
स्पा सेंटर मध्ये घुसून पोलिसांचे गैरकृत्य ; तिघांना अटक
स्पा सेंटर मध्ये घुसून पोलिसांचे गैरकृत्य ; तिघांना अटक
ग्वाल्हेर / नवप्रहार मीडिया
आज पर्यंत आपण स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या आणि त्याठिकाणी पोलिसांनी धाड टाकल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण स्पा सेंटर मध्ये जाऊन तेथील महिलां समोर कपडे काढून महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसां बद्दल तुम्ही कधी ऐकले व वाचले नसाल. पण ग्वाल्हेर मधील एका स्पा सेंटर मध्ये खाकी ला काळिमा फासणारे हे कृत्य घडले आहे. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.वर्दीवर गैरवर्तन करणाऱ्या तिन्ही पोलीस वाल्यांना अटक करण्यात आली आहे.
ग्वाल्हेरच्या एका स्पा सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. एरव्ही स्पा सेंटर्समध्ये चौकशीसाठी जाणारे पोलीस त्या दिवशी स्पा सेंटरमधल्या महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत होते. या संदर्भात स्पा सेंटरच्या संचालिकेनं तक्रार दिल्यानंतर त्या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना 26 मार्च रोजी घडली. मुरैना इथले राजकुमार गुर्जर, नरेंद्र आणि आशुतोष सिंह हे तीन पोलीस कर्मचारी पांढऱ्या रंगाच्या एका कारमधून ग्वाल्हेर सिटी सेंटर भागातल्या स्पा सेंटरमध्ये गेले. तिघांनी एक एक करून त्यांचा गणवेश उतरवला आणि कारमध्ये ठेवला. त्यानंतर ते स्पा सेंटरच्या आत गेले. पोलिसांना अर्धनग्नावस्थेत आत आलेलं पाहून सेंटरमधल्या महिला कर्मचारी घाबरल्या. सेंटरच्या संचालिका व इतर महिला कर्मचाऱ्यांशी त्यांनी गैरवर्तन केलं. तसंच लैंगिक सुखाची मागणीही केली. पैसे हातात ठेवून ‘तसली’ सेवा देण्याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं. ते तिघं मुरैनाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात अधिकारी आहेत.
महिला कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता, त्यांना शिव्या देऊन मारहाण केली. इतकंच नाही तर जीव घेण्याची धमकीही दिली. त्यानंतर ते निघून गेले; मात्र ही घटना सेंटरमधल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत सेंटरच्या संचालिकेनं तक्रार दाखल केली आहे. आधी अज्ञात व्यक्तींबाबत ती तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यात आली.
ग्वाल्हेर पोलीस ठाण्यातले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सियाज केएम यांनी सांगितलं, की स्पा सेंटरच्या संचालिकेनं दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून मुरैनामधल्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगासह इतर गुन्हे दाखल झाले आहेत. सोशल मीडियावर तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. वाहतूक पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये घातलेल्या गोंधळाच्या व्हिडिओवर सोशल मीडियात खूप नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.