मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा -2 अभियानांतर्गत सीताबाई संगई कन्या शाळा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातून प्रथम
अंजनगाव सुर्जी / प्रतिनिधी
सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सीताबाई संगई कन्या शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. शाळा गुणांकन तपासणी पथकाने दोन्ही टप्प्यांमध्ये सर्वच निकषांवर झालेल्या मूल्यमापनानुसार सीताबाई संगई कन्या शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांक घोषित केला. या तपासणी अंतर्गत पायाभूत सुविधा, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रशासकीय कार्यालय, आरोग्य सेवा, प्रयोगशाळा, अटल लॅब, स्वच्छता, क्रीडांगण, परसबाग, शैक्षणिक साधनसामग्री, तसेच एम.टी.एस, एन. एम. एम. एस, शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्यस्तरावर देदीप्यमान यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. अंजनगाव सुर्जी शहरातील 110 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीच्या गौरवशाली इतिहासामध्ये सीताबाई संगई कन्या शाळेने आणखी भर टाकली आहे. उच्चशिक्षित, निपुण, शिस्तप्रिय, कला पारंगत असा शिक्षक व कर्मचारी वर्ग विद्यार्थिनींना आजही सर्व स्तरावर विद्यादानाचे कार्य अविरतपणे करीत आहे. माध्यमिक शालांत परीक्षा, एम. टी. एस, एन. टी. एस, स्कॉलरशिप, होमी भाभा, बाल वैज्ञानिक, नोबेल सायन्स टॅलेंट सर्च, इन्स्पायर अवॉर्ड, गणित प्रज्ञा संबोध, नवोदय, चित्रकला, ओलिंपियाड अशा अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्ये देदिप्यमान यश मिळवून शाळेने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
गणतंत्र दिवस, स्नेहसंमेलन अशा विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम, सर्वधर्म समभाव विशेष पद्धतीने जागृत होईल असे 150 ते 200 विद्यार्थिनींचा सहभाग असलेले अति भव्य सामूहिक नृत्य प्रकार, गायन, नाटिका, भारुड, पोवाडा, एकपात्री प्रयोग, सामाजिक विषयांवरील वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आदींचे विशेष आयोजन या शाळेत केले जाते. अशी सर्व सुख सुविधा असणारी शाळा पालकांची प्रथम पसंतीची शाळा म्हणून नावलौकिक आहे. उत्कृष्ट व भविष्यवेधक दूरदृष्टी असलेल्या संचालक मंडळामुळे ही शाळा वटवृक्षाचे रूप घेत नावारूपाला आली आहे. या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. उत्तम मुरकुटे, पर्यवेक्षिका सौ. नीलिमा सांगोळे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थिनी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. अविनाश संगई, उपाध्यक्ष श्री. उल्हास संगई, सचिव श्री. विवेक संगई, सहसचिव श्री. प्रसाद संगई व श्री. अजय संगई व सर्व व्यवस्थापक मंडळ यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.