तब्बल साडेचार वर्ष तो मृतदेह दुकानातील जमिनीत गाडून करत होता व्यवसाय

ठाणे / नवप्रहार डेस्क
मौलवी चे ते कृत्य शोएब ने बघितले. आता हा आपले कृत्य सगळ्यांना सांगेल आणि आपली बदनामी होईल या भीतीने त्याने शोएबला संपवले.आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून काही कचऱ्यात फेकले. तर काही तुकडे दुकानात पुरले.आणि त्यानंतर काहीच झाले नाही असे भासवत आपला व्यवसाय करू लागला. पण …….
भिवंडी शहरातील नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून काही अवशेष दुकानात गाडून तर काही अवशेष कचऱ्यात फेकणाऱ्या हत्या करणाऱ्यास ठाणे गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे.
घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेषही पोलिसांनी (Police) जप्त केले. गुलाम रब्बानी शेख असे अटक केलेल्या मौलवीचे नाव असून शोएब शेख (वय 17) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे तब्बल साडे चार वर्षानंतर ह्या हत्याप्रकरणाचा उलगडा झाला असून मौलवीला पोलिसांनी अटक केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील शोएब शेख हा युवक 20 नोव्हेंबर 2020 रोजी बेपत्ता झाला होता. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान कालांतराने पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार परिसरात राहणारा मशिदीचा बांगी गुलाम रब्बानी याने शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्याने भिवंडी शहर पोलिसांनी 2023 मध्ये बांगी गुलाम रब्बानी यास पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. परंतु, त्यावेळी पोलिस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पोलिस ठाण्यातून फरार झाला होता, तेंव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते.
ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाला आरोपी गुलाब रब्बानी याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीस आसाममधून अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच शोएब शेख याची हत्या केल्याचे कबूल केले. तसेच, मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्यात तुकडे करून फेकून दिला तर शिर व काही भाग दुकानात गाडून ठेवला असल्याचेही सांगितले. त्यानंतर, स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठा पोलिस फौजफाटा तैनात करीत आरोपीस घटनास्थळी नेण्यात आले. तेथे शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत हत्येमागील कारण उघड होणार आहे.
हत्येचा प्राथमिक अंदाज, कुटुंबीयांकडून फाशीची मागणी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुलाब रब्बानी मजिदीत बांगी असून बाबागिरी करायचा व त्याचे किराणा दुकान देखील होते, याच किराणा दुकानात गुलाब रब्बानी शेखचे काही कृत्य शोएब शेखने पाहिले होते. त्यामुळे, तो सर्वांना सांगेल या भीतीने त्याचा काटा काढण्यासाठी गुलाब रब्बानी शेख यांनी शोएबची हत्या केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आमचा मुलगा शोएब बेपत्ता झाल्यापासून दोन वर्ष याच ठिकाणी आरोपी गुलाब रब्बानी हा राहत होता. आमच्या संपर्कात होता पण त्याने कधी ही हत्या केल्याची कुणकुण लागू दिली नव्हती. स्थानिक पोलिसांनी संशयावरून 2023 मध्ये आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण, त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गुलाम रब्बानी पळून जाऊन फरार झाला होता. आपल्या निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मयत शोएबचे वडील रशीद शेख व कुटुंबीयांनी केली आहे.