गजानन भक्तांची हिवरखेडच्या शिबिराला विशेष पसंती.

अडसूळ फाटा नजीक हिवरखेड वासी देत आहेत अनेक वर्षांपासून सेवा.
बाळासाहेब नेरकर कडून
–
श्री गजानन महाराज सेवा समिती हिवरखेड तर्फे मागील अनेक वर्षांपासून श्री गजानन महाराज प्रगट दिन निमित्त शेगावी जाणाऱ्या येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आडसूळ फाटा ते अंदुरा दरम्यान चार दिवस पर्यंत अहोरात्र महाप्रसाद चहा, पाणी, विश्रांती, मोफत औषधोपचार अशी सेवा दरवर्षी अविरतपणे सुरू असते. यामध्ये हिवरखेड आणि परिसरातील शेकडो स्वयंसेवक आणि गजानन भक्त अहोरात्र आपली सेवा बजावत असतात. सदर महाप्रसादाचा आणि इतर उपलब्ध सुविधांचा चार दिवसांमध्ये एकूण लाखो भाविक लाभ घेत असतात. मागील अनेक वर्षांपासून हा भाविकांसाठी उपयोगी उपक्रम सुरू असल्याने येथील महाप्रसादाची चव भाविकांमध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झाल्याने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा असतानाही अडसूळ फाटा नजीकच्या हिवरखेड येथील शिबिराला श्री गजानन भक्त आवर्जून भेट देऊन प्रथम पसंती दर्शवितात. सदर आयोजनासाठी अनेक गजानन भक्त, हिवरखेड तसेच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्ती तन-मन-धनाने सहकार्य करतात. त्यामुळे हे मोठे आयोजन यशस्वी होऊ शकते. श्री गजानन महाराज सेवा समिती हिवरखेड चे सक्रिय कार्यकर्ते स्व.उमेश भाऊ कोल्हे आणि स्व. केशवराव मुरूमकार यांना शिबिरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शिबिरातील सर्व सेवाधारी रात्रंदिवस अविरत निस्वार्थ सेवा बजावत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच प्रकट दिनानिमित्त शेगावी जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या भाविकांनी अडसूळ फाटा येथील हिवरखेड च्या शिबिराला अवश्य भेट देऊन महाप्रसाद व इतर सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन महाराज सेवा समिती हिवरखेड तर्फे करण्यात आले आहे.