क्राइम

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून कैद्याची हत्या

Spread the love

जळगाव / नवप्रहार डेस्क

                     नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या याच्या खुनात शिक्षा भोगत असलेल्या पाच संशयित आरोपी पैकी एका आरोपीची त्याच ठिकाणी शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हत्या केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. आरोपी शेखर मोघे याला आरोपी त्रास देत असल्याने त्याने सदर कृत्य केल्याचे कबुल केले आहे.

या त्रासामुळे संयम संपलेल्या मोघे याने एकाची गळा चिरून हत्या केल्याची कबुली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यास ताब्यात घेतले असून, हल्ला करण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

२०१९ मध्ये पूर्ववैमनस्यातून भाजपचे नगसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या, त्यांचे थोरले बंधू सुनील खरात, मुलगा सागर आणि रोहित उर्फ सोनू, मुलाचा मित्र सुमित गजरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. रवींद्र यांची पत्नी रजनी, तिसरा मुलगा हितेश यांच्यासह चौघे जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी राज ऊर्फ मोहसीन अजगर खान, मयुरेश सुरवाडे, शेखर हिरालाल मोघे, आकाश सुखदेव सोनवणे, गोलू ऊर्फ अरबाज खान या पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

भुसावळच्या गुन्हेगारीत माजी नगरसेवक रवींद्र खरात मोठे नाव होते. या हत्याकांडानंतर भुसावळ शहरात नव्याने नावारूपाला येऊ पाहत असलेल्या टोळीची क्रेज वाढत होती. अटकेतील पाचही जण भुसावळवर लक्ष ठेवून होते. मोघेच्या भावाने सट्टा, पत्त्याचा क्लब टाकला, तर इतरांचे भाऊबंद व नातेवाइकांनीही भुसावळात अवैध धंदे सुरू केले.

ज्यांचे धंदे नाहीत, अशांचाही दबदबा भुसावळ शहरात होताच. त्यात मोहसीन व त्याच्या भावाचा दबदबा वाढत होता. जेलमध्ये राहून प्रत्येक जण आपआपल्या परीने भुसावळात बस्तान मांडू पाहत होते. अटकेत असलेल्या पाच जणांपैकी शेखर मोघे खरात हत्याकांडात माफीचा साक्षीदार होतो की काय, अशी भीती उर्वरित चौघांना होती. त्यामुळे ते मोघे याचा वेळोवेळी अपमान करून त्रास द्यायचे.

या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोघे चार दिवसांपासून पाळत ठेवून होता. कारागृहात सहा विभक्त कोठड्यांपैकी तीन नंबर बॅरेकमध्ये शेखर हिरालाल मोघे, आकाश सुखदेव सोनवणे, नीलेश चंद्रकांत ठाकूर होते. चार नंबर बॅरेकमध्ये अरबाज अजगर खान, मोहसीन असगर खान व त्यांच्यासोबत मयुरेश रमेश सुरवाडे होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास जिल्‍हा कारागृहात बंदिवानांना बाहेर सोडण्यात आले.

काही अंघोळीला, काही शौचास, तर काही बॅरेकमध्येच झोपून होते. मोहसीन व मयुरेश सुरवाडे बॅरेकमध्ये झोपून होते. मोहसीनचा भाऊ अरबाज बाहेर गेला होता. हीच संधी साधत चार नंबर बॅरेकमधून शेखर मोघे याने बॅरेक तीनमध्ये जाऊन मोहसीनच्या अंगावर बसत त्याचा गळा चिरला व छातीत चाकू खुपसला. मोहसीनच्या विव्हळण्याच्या आवाजाने मयुरेश उठला व त्याने आरडाओरड केल्यावर कर्मचारी धावत आले. नंतर जखमी मोहसीनला रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मोघे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने खुनाची कबुली दिली.

“बॅरेकमध्ये घटना घडल्यानंतर शिट्ट्या वाजायला सुरवात होताच बंदिवानांची मोजणी करून बाहेर पडलेल्या तुरूंगाधिकारी गजानन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. जखमीला तातडीने खासगी रिक्षा बोलावून रुग्णालयात दाखल केले. तसा अहवाल तातडीने वरिष्ठांना सादर केला आहे.” – अनिल वाढेकर, कारागृह अधीक्षक

अशी घडली घटना

जिल्हा कारागृहात बुधवारी (ता. १०) नेहमीप्रमाणे कामकाजाला सुरवात होऊन सकाळी बंदिवान बॅरेकमधून मोकळे करण्यात आले. काही बंदिवान नेहमीप्रमाणे सकाळची आवश्यक कामे आटोपत होते. त्यात काही अंघोळ करत होते, काही कपडे धुवत होते. अशातच बॅरेक क्रमांक चारमधून मयूरेश सुरवाडेच्या आरडाओरडचा आवाज आल्याने काही बंदिवानासह काराहगृह रक्षकांनी धाव घेतली.

बॅरेकमध्ये मोहसीन असगर खान रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. त्याच्याजवळ हातात चाकू घेऊन शेखर मोघे आढळून आला. तातडीने त्याला ऑटोरिक्षा बोलावून कारागृहातून जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले. वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन पाटील यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर फौजफाट्यासह दाखल झाले. जिल्‍हा पोलिस दलाच्या फॉरेन्सिक टीमसह सीआयडीचे अधिकारी एकापाठोपाठ पोचले. उपजिल्‍हाधिकारी सोपान कासार, डीवायएसपी संदीप गावित यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून नेमकी घटना जाणून घेतली.

वर्चस्वाचा वाद

मृताचे कुटुंबीय आणि भुसावळकरांकडून प्राप्त माहितीनुसार मृत रवींद्र खरात याच्या हत्येतील मोहसीन व त्याचा भाऊ अरबाज या दोघांचा भुसावळात दबदबा निर्माण झाला होता. शेखर मोघेच्या भावाने जुगाराचा अड्डा सुरू केला असून, तोही ‘फार्म’मध्ये होता. दोन दिवसांपूर्वी मोघेच्या भावाने तुरुंगात जाऊन त्याची भेट घेत भुसावळचे वातावरण अवगत केल्याची चर्चा आहे. तेव्हाच या दुश्‍मनीला खतपाणी मिळाले असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

इन कॅमेरा शवविच्छेदन

घटनेची माहिती मिळाल्यावर मोहसीनच्या कुटुंबीयांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणावर त्याचे आप्तस्वकीय आले होते. मात्र, शासकीय सोपस्कर पार पाडण्यासाठी सायंकाळचे पावणेपाच वाजले. त्यानंतर मृत न्यायबंदी मोहसीन असगर खान याचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा विच्छेदन करण्यात येऊन मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close