फ्रेंडशिप डे निमित्य आज जिल्ह्यात तरुणाईचा जल्लोष..

बहरणार मैत्रीचे नाते
भंडारा विशेष प्रतिनिधि / अजय मते
मैत्रीच्या नात्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. यानिमित्त तरुणाईच्या उत्साहाला जिल्ह्यात उधाण आले आहे. आज रविवारी सुटी असल्याने शनिवारीच कॉलेज परिसरात मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना शुभेच्छा देत फ्रेंडशिप डे साजरा केला. व्हॉटस् अॅपवरूनही एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे मैत्रीचे नाते पुन्हा बहरणार आहे.
मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण, मैत्री म्हणजे सुख-दुःखातील सोबत, मैत्री म्हणजे धमाल मस्ती, आजच्या तरुणाईच्या भाषेत झाले तर एका वाक्यात मैत्री म्हणजे जीवाला जीव देणारी नातेवाइकांपेक्षा जवळची व्यक्ती. त्यामुळेच कोणी कितीही नावे ठेवली, तरी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारचे म्हणजेच ‘फ्रेंडशिप डे’चे दणक्यात सेलिब्रेशन तरुणाई करत असते. यंदाही मोठ्या उत्साहात हा ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जात आहे. त्याची जय्यत तयारी तरुणाईकडून सुरू आहे.
सोशल मीडियावर धूम..!!
सोशल मीडियावरदेखील ‘फ्रेंडशिप डे’ची क्रेझ दिसून आली. शनिवारी रात्रीपासूनच फेसबुक, टेलिग्राम, मेसेंजर, व्हॉटस् अॅप आदींवर ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देणारे संदेश फिरू लागले. सोशल मीडियावर अनेक फनी मेसेज अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
.
सुटीत दोस्तांची धमाल..!!!
महाविद्यालयांना आज सुटी असल्याने अनेकांनी तर या ‘डे’च्या निमित्ताने ग्रुपमध्ये 8 चित्रपट पाहण्यास जाणे, एकत्र सहलीला जाणे, ट्रेकिंगला : जाणे, हॉटेलात एकत्र जेवण असे प्लॅनिंग तरुणाईने केले आहे. लहान मुलांनीही शनिवारीच वर्गातील मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड बांधले.
.
हुल्लडबाजी कराल तर ..!!!
‘फ्रेंडशिप डे ‘ दिवशी अनेक ठिकाणी तरुणाईकडून हुल्लडबाजीचे प्रकार घडतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. रविवारीही पोलिसांकडून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
.
आज अनेक उपक्रम..!!!
शहरासह जिल्ह्यात विविध गुप्सतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. यंदाही विविध ग्रुपकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये अनेक पक्ष, संघटना तसेच राजकीय व्यक्तींकडून होणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे.