आत्महत्याग्रस्त शेतकरी व माजी सैनिकांच्या पाल्यांना निशुल्क शिक्षण
सिनेट सदस्य डॉ नितीन टाले यांची मागणी
अमरावती / प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी व माजी सैनिकांच्या पाल्यांना निशुल्क प्रवेश तसेच परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. नितीन टाले यांनी केली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात येणारे पाचही जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून परिचित आहे. अनियमित पर्जन्यमान, उत्पादन शुल्कातील वाढ, शेतमालाला रास्त भाव न मिळणे, जलसिंचनाच्या प्रकल्पा अभावी केवळ पावसावर शेती अवलंबून असणे, पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, द्राक्ष ,डाळिंब या पिकांना ज्या पद्धतीने शासन संरक्षण देते त्याप्रमाणे विदर्भातील कपाशी संत्रा व इतर पिकांबाबत शासनाचे असणारे उदासीन धोरण अशा अनेक कारणांमुळे कर्जबाजारी होऊन विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये याकरिता त्यांचे पाल्य, त्याचप्रमाणे देशाच्या संरक्षणा करता जीवाची बाजी लावणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणाचे दायित्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्वीकारून त्यांची प्रवेश फी व परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी सिनेट सदस्य डॉ नितीन टाले व कैलास चव्हाण यांनी केली. सिनेट सभागृहामध्ये या मागणीबाबत चर्चा करण्यात आलेली होती. याबाबत तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकरच पत्र निर्गमित करण्याचे आश्वासन प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर यांनी दिले.