पाच लाखात बाळ ; अनधिकृत नर्सिंग होम ची कमाल

या प्रकरणातील मास्टरमाईंड ला अटक
ट्रॉम्बे पोलिसांनी केला रॅकेट चा भांडाफोड
मुंबई / नवप्रहार मीडिया
बाळाची इच्छा असंणाऱ्या परंतु त्यासाठी सक्षम नसणाऱ्या लोकांना हेरून बाळ।विक्री करणाऱ्या रॅकेट चा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेट ची मास्टरमाईंड ज्युलिया लॉरेन्स फर्नांडिस हिला पोलिसांनी अटक केली आहे. ज्युलिया ही IVF सेंटर ला स्पर्म डोनर उपलब्ध करून देत असल्याने तिला बाळाची आवश्यकता असलेल्या लोकांशी जवळीक व्हायची आणि याच माध्यमातून ती बाळ विक्री करीत होती.बाळ पाच लाख रुपयात विकले जायचे. तर बाळ विक्री करणाऱ्या दाम्पत्याला ती फक्त 1 लाख द्यायची.
मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी भागात चालत असलेल्या अनधिकृत रहमानी नर्सिंग होमच्या माध्यमातून सुरू असलेल्या या बालक विक्री रॅकेटचा पर्दाफाश ट्रॉम्बे पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दोन नवजात शिशूंची सुटका केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेली ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. बाळ विक्री प्रकरणात आता तिच्याविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. तुरुंगातून नुकतीच जामिनावर सुटली होती. ज्युलीया फर्नांडिस नवजात बाळांच्या विक्रीचे रॅकेट चालवत असे.
पोलिस तपास पथकातील सूत्रांनी सांगितले की, फर्नांडिस हिला यापूर्वी अशा सहा प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. ती आयव्हीएफ केंद्रांसाठी डोनेटरची व्यवस्था करतो. IVF हे प्रजननक्षमतेची समस्या असलेल्या लोकांना बाळ होण्यास मदत करण्यासाठी उपलब्ध अनेक तंत्रांपैकी एक आहे. या केंद्रांद्वारे ती मुलाची गरज असलेल्या लोकांशी संपर्क साधत होती. त्यानंतर ती आपल्या एजंटांच्या मदतीने ती नवजात बाळाला विकू इच्छिणाऱ्या पालकांसोबत बोलणी करत असे आणि बाळांची विक्री करायची.
फर्नांडिसने बाळाची गरज असलेल्या लोकांचा आणि ते विकणार असलेल्या पालकांचा शोध घेण्यासाठी तीन एजंट ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या तीन एजंट महिला आहेत. यामध्ये गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलाबशा मतीन शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्याशिवाय, पोलिसांनी या रॅकेटची मास्टरमाईंड ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस, सायराबानो नबीउल्ला शेख यांना अटक केली आहे. त्याशिवाय, नवजात बाळाचा व्यवहार करणारी पालक रिना नितीन चव्हाण हीलादेखील पोलिसांनी अटक केली. यामध्ये सायराबानो नबीउल्ला शेख ही बोगस डॉक्टर असल्याचे समोर आले आहे.
ट्रॉम्बे पोलिसांनी भा.दं.वि. कलम 370, 34 सह बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील कलम 81 आणि 87, तर, महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनयम 1961 मधील कलम 33 आणि 36 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी 5 दिवसांच्या आणि 45 दिवसांच्या दोन नवजात बालिकांची सुटका केली आहे. पोलिसांनी त्यांना देखरेखीसाठी स्वयंसेवी संस्थेकडे सोपवले आहे.
या रॅकेटमध्ये महिलांची प्रसुतीदेखील अनधिकृत नर्सिंग होम मध्ये केली जात होती. बाळाच्या पालकांना बाळासाठी एक लाख रुपये देण्यात येत होते. तर, वैद्यकीय आणि इतर खर्च आरोपींकडून करण्यात येत असे.
मास्टरमाईंड फर्नांडिस हीला जुलै 2022 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अशाच प्रकरणांमध्ये अटक केली होती. वरळी येथील रहिवासी असणाऱ्या ज्युलीया फर्नांडिस हिच्यावर एकूण सात गुन्हे असून तिच्यावर वडाळा टीटी, ठाणे आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
फर्नांडिस ही एक अहम नावाची स्वयंसेवी संस्थादेखील चालवते. आता, या स्वयंसेवी संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी नागरिकांना योग्य सरकारी संस्था आणि नियमांनुसार बाळांना दत्तक घेण्याचे आवाहन केले असून अशा बेकायदेशीर पद्धती टाळण्यास सांगितले आहे. बेकायदेशीरपणे बाळ दत्तक घेणे, त्यांची विक्री-खरेदी करणे गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.