शेतावर ताबा करण्याच्या धमकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, दोन एमसीआर तीन पीसीआर

हदगाव प्रतिनिधी / बालाजी पाटील
तालुक्यातील बाभळी या गावातील शेतकरी रामेश्वर हनुमंतराव नरवाडे वय ४५ यांनी काही लोकांकडून व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही वसुलीसाठी तगादा लावल्यामुळे स्वतःच्या शेतात जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्या शेतकऱ्यांने आपल्या खिशात चिठ्ठीमध्ये त्रास देणाऱ्या लोकांची नावे लिहून ठेवली होती. या प्रकरणी हदगांव पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी पाचही लोकांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत तर तीन जणांना दोन दिवसासाठी पोलीस कोठडी सुनावली.
मयताचा मुलगा आशीष रामेश्वर नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार शेतकरी रामेश्वर नरवाडे यांनी काही लोकांकडून शेती खर्चासाठी व बियाणे खतासाठी व्याजाने पैसे घेतले होते. सदर शेतकऱ्यांनी त्या लोकांचे पैसे शेती विकून परत केले. परंतु आरोपींनी संगणमत करून रामेश्वर याला अधिकचे पैसे देण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. पैसे नाही दिल्यास शेतावर कब्जा करू अशी धमकी दिली होती. अशा या त्रासास कंटाळून दिलेल्या त्रासामुळे स्वतःच्या शेतामध्ये आरोपींची नावे चिठ्ठीवर नमूद करून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी
प्रकाश गणपत तंत्रे, सुरेखा प्रकाश तंत्रे राहणार बाभळी. तसेच नामदेव जाधव, शिंधू नामदेव जाधव आणि नामदेव यांचा मोठा मुलगा शिद्धेश्वर नामदेव जाधव राहणार करंजी तालुका हिमायतनगर या लोकांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर हदगाव पोलिसांनी वेगवान चक्रे फिरून रात्रीच उशिरा आरोपींना ताब्यात घेतले. आज सकाळी त्यांना हदगाव येथील न्यायालयात हजर केले असता यातील सिंधु जाधव आणि सुरेखा तंत्रे या दोन महिलांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर प्रकाश तंत्रे नामदेव जाधव सिद्धेश्वर जाधव या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन पवार यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड हे करीत आहेत.