पाच लाखांच्या नकली नोटा देत बळकावले 2 लाखांचे ओने ,; महिलेची फसवणूक

नागपूर / नवप्रहार मीडिया
वयोवृद्ध महिलेला एकटे गाठून तिच्या अंगावरील दागिने काढून घेत आणि त्या ऐवजी तिच्या पिशवीत नकली नोटांचे बंडल ( पाच लाख ) ठेवत सोनं घेऊन पसार झालेल्या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने दिल्ली येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
गिरीपेठ येथील रहिवासी असलेल्या दमयंती समशेर बहादुर सिंग (69) या 18 जानेवारीला सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान कुकर दुरुस्तीसाठी घराबाहेर पडल्या. वाटेत त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटले. त्यांनी वयोवृद्ध दमयंती यांना विश्वासात घेतले. आम्हाला गरीब मुलांची मदत करायची आहे, असे सांगून त्यांना जवळचं असलेल्या भोजनालयाकडे घेऊन गेले.
त्यानंतर या दोघांपैकी एकाने दमयंती यांच्याकडे असलेल्या पिशवीत पाच लाख रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवले आणि दमयंती यांना अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून दमयंती यांनी सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे लॉकेट असा एकूण 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढला. आरोपींनी पिशवीत दागिने ठेवत असल्याचे भासवून दागिने घेऊन फरार झाले. आरोपी गेल्यानंतर दमयंती यांनी पॉलिथीनमधील पैशांचे बंडल तपासले असता, वरच्या बाजूला 500 रुपयांची नोट तर खालील भागात कोरे कागद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हा सर्व प्रकार समजताच त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी लगेच या परिसरात त्या दोघांचा शोध घेतला, मात्र तोपर्यंत ते दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दमयंती यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठत आपबिती सांगितली. त्यानंतर दमयंती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.
सापळा रचून आरोपींना दिल्लीतून अटक
त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरामधील फुटेज पोलिसांनी तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीताबर्डी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे तांत्रिक तपास करून आणि सायबर पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचे लोकेशन मिळविले. त्यानंतर या लोकेशनवर सापळा रचून आरोपींना दिल्ली येथून अटक केली. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून दोन सोन्याच्या बांगड्या, लॉकेट, दोन मोबाइल आणि रोख 49 हजार असा एकूण 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.संजय रामलाल सोलंकी (27, रा. कराला, शिवविहार, उत्तर पश्चिम दिल्ली) आणि गोविंद उकाराम राठोड (49, रा. रघुवीरनगर, उत्तर दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
.