फहीम खान व्यतिरिक्त इतक्या लोकांच्या घरावर चालणार होता बुलडोजर

नागपूर / प्रतिनिधी
नागपूर मध्ये घडलेल्या दंगलीचा मास्टर माईंड म्हणून पोलिसांच्या रेकॉर्ड वर असलेल्या फहीम खान वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो जेल मध्ये आहे. फहीम खान याचे घर मनपा ने पाडले आहे. फहीम खान शिवाय आणखी 51 लोकांच्या घरावर बुलडोजर चालणार होता. पण उच्च न्यायालयाने या कारवाईवर नाराजी दाखवून ती बेकायदेशीर असल्याचे म्हटल्याने मनपा ला आपला बेत रद्द करून दोन पावले मागे यावे लागले आहे.
नागपूरमध्ये राडा घालणाऱ्या तब्बल 51 आरोपींच्या घरांचा पाडकामाचा कार्यक्रम नागपूर महापालिकेने हाती घेतला होता. सर्वांच्या घराच्या नकाशाची पडताळणी करून अवैध बांधकामाची माहिती गोळा केली जात होती.
मात्र, दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान याचे घर पाडल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेची कारवाईच बेकायदेशीर ठरवल्याने तुर्तास सर्वांना दिलासा मिळाला आहे.
फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगडफेक, दंगलीचे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा देऊन नुकसान भरपाई आरोपींकडून वसूल केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या प्रशासनाने अवैध बांधकामाबाबत फहीम खानच्या कुटुंबियाला नोटीस बजावली होती.
चोवीस तासांच्या आत अवैध बांधकाम काढावे अन्यथा आम्ही काढू असे त्यात बजावले होते. त्यानंतर सोमवारी (ता. 24) सकाळी दहा वाजताच बुलडोझरने फहीम खानचे दोन मजली घर पाडण्यात आले होते. सोबतच आणखी आठ आरोपींच्या घरावर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली होती. या दरम्यान त्याच्या आईने कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईवर ताशेरे ओढून ती नियमानुसार नसल्याचे सांगितले. सोबतच पंधरा दिवसांच्या आता उत्तर दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. या आदेशामुळे महापालिका प्रशासाने एक पाऊल मागे घेतले असल्याचे दिसून येते. आता या प्रकरणावर 15 एप्रिलला सुनावणी होणार आहे.त्यानंतरच महापालिकेच्या कारवाईचे काय होते हे स्पष्ट होणार आहे.
फहीम खानच्या घर पाडल्यानंतर विरोधकांनी उत्तर प्रदेशाच्या बुलडोझर पॅटर्नला कडाडून विरोध केला. काँग्रेसत्या सत्यशोधन समितीचे सदस्य हुसैन दलवाई यांनी फक्त अल्पसंख्याकांनाच टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे.
नागपूरच नव्हे तर राज्यातील सर्वच शहरात अवैध बांधकाम झाले आहेत. ते का पाडले जात नाहीत, इतर प्रकरणातील अवैध बांधकाम करणाऱ्या आरोपींच्या घरावर बुलडोजर का चालवता जात नाही असा सवाल हुसैन दलवाई यांनी केला आहे.