विधानसभेत समान न्यायाने उमेदवारी देणार • प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांची पत्रपरिषदेत माहिती
आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने मांडली भुमिका
नांदगाव खंडेश्वर / प्रतिनिधी
एकीकडे राज्यात आरक्षणाच्या विषयावरून वादंग निर्माण झालेला असताना जाती- जातींमध्ये फुट पाडून बडे राजकीय पक्ष आपापली राजकीय पोळी शेकून घेत आहेत. विकासकामांवरून जनतेचा फोकस हटवून मराठा – ओबीसी असा वाद निर्माण करून जनतेला मूर्ख बनवले जात आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मांना समान न्याय आणि समान हक्क ही कायम भुमिका असलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या विधानसभा निवडणूकीत सर्व समाजाला समान न्यायाने विविध विधानसभा मतदारसंघांमधून तिकिटे दिली जातील अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
स्थानिक विश्राम गृह येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रेची भुमिका विशद केली. अड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात आरक्षण बचाव मोहिम हाती घेऊन पुढे चालली आहे. संपूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळतो आहे. त्यामुळे राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांना पुन्हा एकदा वंचितची धाकधुक लागली आहे. संविधान बचावचा नारा देणाऱ्या वंचितच्या लढ्याचा फायदा राज्यात महाविकास आघाडीला मिळाला मात्र त्यातून जे समुदाय कधीही सत्तेत जाऊ शकले नाही त्यांचा कुठेही फायदा झाला नाही. इथला दलित, ओबीसी, मुस्लिम, धनगर, तेली, माळी, आदिवासी आजही सत्तेपासून दूरच आहे. त्यांना केवळ नावापुरतेच वापरून घ्यायचे हे सर्वच राजकीय पक्षांचे धोरण आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने आजवर सर्वच समाजाच्या उमेदवारांना उमेदवाऱ्या देऊन आपण कुठेही भेदभाव करत नसल्याचे वारंवार दाखवून दिले आहे. सर्व समाजांना सोबत घेऊन त्यांना सत्तेचा वाटा देणे हेच बाळासाहेब आंबेडकरांचे धोरण आहे. सत्तेत असलेल्यांना हे धोरण मान्य नाही म्हणूनच ते सातत्याने वंचित आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र सत्ता असो किंवा नाही आमची भुमिका कणखर होती आणि राहील. सत्तेसाठी एखादे मंत्रीपद घेऊन राजकीय पक्षात जाऊन बसणे ही भुमिका बाळासाहेब आंबेडकरांना मान्य नाही.
आज आरक्षण बचाव यात्रा राज्यात सुरू असताना राज्यात मराठा आणि ओबीसी असा वाद जाणून बुजून निर्माण करण्यात येत आहे. हा वाद का आणि कसा निर्माण करून नेमका कोणाला फायदा होणार हे देखील सर्व जाणून आहेत. आरक्षणावर पहिला अधिकार हा इथल्या वंचितांचा आणि आदिवासींचा आहे. अर्थातच ओबीसींना देखील त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणे गरजेचेच आहे. मराठा समाजाला आरक्षण शरद पवारांनी महाविकास आघाडीची सत्ता यापूर्वी आणि देशात काँग्रेसची सत्ता असताना देखील कधीही दिले नाही. आता सत्ता नाही म्हणून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद निर्माण करून पुन्हा मराठा समाजाला गृहित धरून काम करायचे हे जुने राजकारण पवारांचे आहे. भाजपला तर आरक्षण या देशातूनच नष्ट करायचे आहे. त्यामुळे महाविकास असो किंवा महायुती यांना वंचित घटकांचे आरक्षण देण्यात किंवा एखाद्या समाजाला न्याय देण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. यांना केवळ सत्ता हवी आहे. मात्र वंचितला सर्व समाजाला न्याय देण्याची भुमिका कायम ठेवायची आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात सर्व जाती – धर्मांमध्ये समान न्यायाने तिकिटे देईल अशी भुमिका डॉ. विश्वकर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.
वंचितची भुमिका कणखर असल्याने अडचण
वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय पक्ष असून तो कुणाच्या दारात उभा राहून तिकीटांची मागणी करणारा उमेदवारांचा समुह नाही. त्यामुळे युती करत असताना राजकीय पक्षांनी तेवढ्या सन्मानाने वंचितला सोबत कधीही घेतले नाही. आम्ही प्रयत्न केला परंतू त्यांची मानसिकता ही वंचित घटकातील लोकांना न्याय देण्याची कालही नव्हती आणि उद्याही राहील याची शाश्वती नाही. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना केवळ सत्ता हवी मात्र वंचितांना सत्तेचा वाटा देण्यास ते तयार नाही. लोकसभेत देखील चांगल्या सीट देण्याची मानसिकता नसल्यानेच युती होऊ शकली नाही. वंचितची भुमिका ही कणखर आहे आपण कुणापुढे पदर पसरत नाही आणि यापुढेही पसरणार नाही. संविधान वाचविण्यासाठी राज्यभरात वंचित लढली आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला हे वास्तव आहे. परंतू राज्यातील अठरा पगड जातीसमुहाच्या सर्वच घटकांनी हे समजून घ्यावे अन्यथा भविष्यात देखील प्रस्थापितांच्या हातात राजकारण आणि तुमच्या आमच्या हातात चाकरी करण्याइतकेच राजकारण शिल्लक राहील. वंचित आघाडी सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढते आहे हे आता समजून घेणे गरजेचे आहे.या पत्रकार परिषदेला सिद्धार्थ भोजने, अनंत खडसे, लालचंद इंगोले, नासीर भाई, रोशन गाडेकर, सागर भवते, जयकिरण इंगोले, प्रदीप थोरात, राहुल मेश्राम, अविनाश राऊत आदींची उपस्थिती होती.