निवडणूक कर्मचाऱ्यांची घाई, अल्पवयीन च्या बोटाला शाई आणि निलंबनाची कारवाई

निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाचोड येथील मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. दिलीप नरवडे (केंद्र प्रमुख) ज्यांच्या देखरेखीखाली हा प्रकार घडला, तसेच मतदान अधिकारी आणि अन्य एक कर्मचारी ज्यांनी अल्पवयीन मुलांच्या बोटाला शाई लावली यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी केली. या चौकशीत निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाल्याने आज निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमच या कारवाईतून जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिनी मंत्रालयाचे कारभारी कोण? उद्या होणार फैसला
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील मिनी मंत्रालयाचा कारभार कुणाच्या हाती जाणार ? पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला सोमवारी होणार आहे. शनिवारी चार जिल्ह्यांत झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक शनिवारी झाली. त्यात मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा समावेश होता. नगरपालिका, महापालिकांपाठोपाठ या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुकांची निवडणुकीत चांगलीच गर्दी होती. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा, डिजिटल माध्यमांचा प्रचारासाठी वापर, आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. जवळपास तीन वर्षांपासूनचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासक राज संपणार आहे.



