वर्धा लोकसभा मतदार संघाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटातर्फे हर्षवर्धन देशमुख की समीर देशमुख संभ्रम कायम
चांदुर रेल्वे प्रतिनिधी – प्रकाश रंगारी
लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसाचा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चे बांधिला सुरुवात केली आहे. अशातच वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे वर्धेचे समीर देशमुख सुद्धा इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यांनी शनिवारी चांदुर रेल्वे तालुक्याचा दौरा करून अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे.
यंदा महाविकास आघाडी इंडिया आघाडी तर्फे वर्धा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ( तुतारी) ला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची इच्छुक उमेदवार दौरे करीत आहे. काही दिवसापूर्वी चांदुर रेल्वे शहरात शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दौरा करून महाविकास आघाडीची एक छोटेखानी बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी बोलताना शरदचंद्र पवार यांचा फोन आला होता व त्यांनी मला तयारीला लागा असा आदेश दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे हर्षवर्धन देशमुख यांची तिकीट पक्की मानल्या जात होती. मात्र आता यामध्ये नवीन टविस्ट पाहवयास मिळाला आहे. शनिवारी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धेचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वर्धेचे माजी अध्यक्ष समीर देशमुख यांनीही चांदुर रेल्वे तालुक्यासह धामणगाव मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिसरातील अनेक नेत्यांच्या भेटी सुद्धा घेतल्या. तसेच स्थानिक विश्रामगृहावर आयोजित एका छोटे खानी बैठकीत समीर देशमुख यांनी सदर उमेदवारी आपल्याला मिळणार असल्याचा दावा केला आहे. समीर देशमुख यांचे वडील प्राध्यापक सुरेश देशमुख हे 2009 मध्ये वर्धा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. तर समीर देशमुख यांनी 2009 पासून ते 19 पर्यंत वर्धा लोकसभा मतदार संघाकरता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीन वेळा तिकीट मागितली. मात्र त्यांना तिकीट मिळाली नाही. त्यामुळे यंदाची त्यांची तिकीट मागण्याची चौथी टर्म असल्यामुळे त्यांनी सांगितले. तसेच मला उमेदवारी मिळून मी निवडून आल्यास चांदुर रेल्वे परिसरातील समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही दिली. तसेच देशाच्या राजकारणावर बोलताना त्यांनी म्हटले की, सध्या भाजपाकडून एका विशिष्ट धर्माला टार्गेट केल्या जात आहे. त्यामुळे अखंड देश ठेवण्यासाठी सर्वांनी इंडिया आघाडी महाविकास आघाडीला निवडून देणे गरजेचे आहे. असे समीर देशमुख यांनी म्हटले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे हर्षवर्धन देशमुख की समीर देशमुख असा संभ्रम निर्माण झाला असून सदर चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.