राष्ट्रवादीवर ‘ दादां ‘ चा दावा

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क
अजीत पवार यांच्या नेतृत्वात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या राष्ट्रवादी च्या 40 आमदारांनी अजित पवार हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत असा ठराव पास करुन तो निवडणूक आयोगाकडे दिल्याने राष्ट्रवादीवर ‘ दादा ‘ नी दावा ठोकला आहे. हा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे ठरावात म्हटले आहे. तर शरद पवार यांनी आमचे म्हणणे ऐकल्या अहिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती आयोगाकडे केली आहे.
अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 जून रोजीचे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्रदेखील अजित पवार यांनी 5 जुलैला म्हणजे आज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या चिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगात
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. आपल्याला पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.
शरद पवारांची आयोगाकडे विनंती –
आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सर्व प्रकरणाकडे पाहता ही शिवसेना फुटीनंतरच्या प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं सातत्याने जाणवतं.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडील अर्जात काय म्हटलंय?
राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे, त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील अर्ज केला आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, म्हणजेच शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांनी केलेल्या अर्जानुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत एकतर्फी निर्णय देता येणार नाही, त्यांना निर्णय देण्याआधी शरद पवार गटाची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे, हे प्रकरण आता निवडणूक आयोगात गेलं आहे. त्यानुसार अजित पवारांकडे पक्षाचे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे.