सिंचन विहिरीसाठी लाच मागणे भोवले

कारंजा मधील मग्रारोहयोचे तांत्रिक अधिकारी मोरे कार्यमुक्त.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई.
वाशिम / प्रतिनिधी
महाराष्ट्र ग्राम रोजगार हमी योजना अंतर्गत कारंजा तालुक्यातील तांत्रिक अधिकारी रणजित गजानन मोरे यांना कंत्राटी सेवेतून कमी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले आहेत. शेलूवाडा (ता. कारंजा) येथील शेतकऱ्यांनी मोरे यांच्याबाबत कारंजा गट विकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी चौकशी करुन सदर कर्मचाऱ्यास कार्यमुक्त करण्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला होता.शेलुवाडा येथील शेतकरी शेख कलीम शेख हबीब आणि सय्यद सादिक युसुफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तांत्रिक अधिकारी रणजीत मोरे यांनी विहीर मंजुरीसाठी वीस हजार रुपयाची मागणी केली होती. ज्यांनी पैसे दिले त्यांच्या विहिरींना मंजुरी दिली होती आणि ज्यांनी पैसे नाही दिले त्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचे सांगून प्रस्ताव फेटाळण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच मोरे यांच्याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत विविध वर्तमानपत्रात वृत्त प्रसारित झाले होते. या बाबीची गंभीर दखल घेत सीईओ वैभव वाघमारे यांनी रणजीत मोरे यांना कंत्राटी सेवेमधून कार्यमुक्त केले आहे.