शाशकीय

आत्मसमर्पित नक्षल दांपत्याचे परखड मत

Spread the love

संविधानाने दिलेला हक्क आणि क्रांती कोणीही हिरावू शकत नाही

गडचिरोली / प्रतिनिधी

                      वयाच्या ११ व्या आणि १२ वय वर्षी नक्षल चळवळीत सामील झालेल्या आणि आता त्यापासून दूर होत आत्मसमर्पण करून सामान्य जीवन जगणाऱ्या दांपत्याने नक्षल चळवळीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते  बंदुकीतून मिळालेली क्रांती बंदुकीनेच हिरावली जाऊ शकते, परंतु संविधानाने दिलेला हक्क आणि क्रांती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे परखड मत  असीन राजाराम आणि जनिता जाडे या तरुण दाम्पत्याने भूपतीच्या आत्मसमर्पण सोहळ्यात व्यक्त केले.

या दोघांनीही मागील वर्षी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे दोघांची लग्नगाठ भूपतीने बांधली होती.

हरियाणाचा रहिवासी असलेला असीन राजाराम वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी, तर गडचिरोलीची जनिता जाडे ११व्या वर्षी नक्षल चळवळीत सहभागी झाली होती. असीनने तब्बल २६ वर्षे, तर जनिताने १८ वर्षे आपले आयुष्य नक्षल चळवळीसाठी समर्पित केले होते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध नाटक दाखवून आपली दिशाभूल केली. यामुळे प्रभावित होऊन आपण देशातील ‘काळ्या इंग्रजांना’ घालवण्यासाठी क्रांतीच्या मार्गावर गेलो, असे असीनने सांगितले.

तर दुसरीकडे, घरची हलाखीची परिस्थिती आणि शिक्षण सुटल्याने आपण नक्षलवाद्यांकडे आकर्षित झालो, असे जनिताने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, चळवळीत असताना भूपतीनेच या दोघांचे लग्न लावून दिले होते.

जंगलातील खडतर आयुष्य आणि सतत मृत्यूच्या छायेत वावरताना या दोघांचा सशस्त्र क्रांतीवरील विश्वास हळूहळू उडू लागला. जनिता सांगते, सुरुवातीला भूपती दादाने मला मुलीप्रमाणे सांभाळले, पण जसजशी मोठी झाले, तसतसे जंगलातील भीषण वास्तवाला सामोरे जावे लागले. अनेकदा तर आठवडा-आठवडा उपाशी राहावे लागायचे, पावसाळ्यात १५-१५ दिवस पाऊस थांबत नसल्याने प्रचंड हाल व्हायचे. या दोघांच्या विचारांना कलाटणी मिळाली ती २०१४ नंतर.

रोहित वेमुला प्रकरणानंतर देशभरात संविधानावर सुरू झालेल्या चर्चेमुळे असीनने पहिल्यांदाच संविधानाचा गांभीर्याने अभ्यास केला. तो सांगतो, आम्हाला आधी वाटायचे की हे संविधान इंग्रजांकडून उचललेले आहे. पण जेव्हा मी गडचिरोलीतील पेसा कायदा, वन हक्क कायदा आणि पाचवी-सहावी अनुसूची वाचली, तेव्हा मला कळले की आम्ही ज्या हक्कांसाठी लढत आहोत, ते तर संविधानाने आधीच दिलेले आहेत. मग आपल्याच आदिवासी बांधवांना पोलिसांच्या गणवेशात आणि नक्षलवाद्यांच्या गणवेशात एकमेकांविरुद्ध लढवून काय साध्य होणार होते.

हाच विचार मनात पक्का झाल्यावर २०१८ मध्ये या दोघांनी नक्षलवादी संघटना सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल सहा वर्षे त्यांनी हिमाचल प्रदेशात अज्ञातवासात काढली. अखेर, महाराष्ट्र पोलिसांच्या पुनर्वसन योजनेवर विश्वास ठेवून २०२४ मध्ये त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शरणागती पत्करली.

सध्या जनिता पोलीस संरक्षणात असून, महात्मा फुलेंच्या ‘किसान का कोडा’ या पुस्तकाचा अनुवाद करत आहे. तिने सातवीपर्यंत शिक्षण घेतले असून, आता पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर असीनलाही आता शांततेच्या मार्गाने देशासाठी काम करायचे आहे, असे तो आवर्जून सांगतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close