अनैतिक संबंधामुळे वाढणार होता दुरावा पण भरोसा सेल ने जुळवले

नागपूर / विशेष प्रतिनिधी
दोघेही वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेम फुलले . शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लव्ह मॅरेज केले. ती त्याच्याशी एकनिष्ठ होती. पण त्याचे अन्य तरुणीसोबत ही अनैतिक संबंध होते. तिला कळल्यावर वाद वाढला. नाते तुटण्याच्या मार्गावर आले. त्यामुळे तिने भरोसा सेल मध्ये धाव घेतली. आणि …….
.
सौरभ आणि रिना (बदललेले नाव) हे दोघेही एकाच वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघेही अभ्यास हुशार होते. शिक्षण घेताना सुनीलने तिच्याशी मैत्री केली. दोघांची मैत्री काही दिवसांत प्रेमसंबंधात बदलली. त्यांनी पदवी पूर्ण झाल्यानंतर प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, दोघांचेही प्रेमप्रकरणाची महाविद्यालयात मोठी चर्चा होती. डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर सौरभ आणि रीना यांनी कुटुंबियांच्या परवानगीने प्रेमविवाह केला. तो धरमपेठमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागला तर रिना ने स्वतःचे क्लिनिक उघडले. वर्षभर संसार सुरळीत सुरु होता. त्यांना एक गोंडस बाळ झाले आणि काही दिवसांतच सौरभ चा स्वभाव बदलला. तो उशिरा घरी यायला लागला आणि तो बरेचदा मोबाईलवर कुणाशीतरी बोलत राहायचा. त्यामुळे रिनाला त्याच्यावर संशय आला. त्याला जुगाराचा नाद लागला आणि कर्जसुद्धा काढले. पगारही तो जुगारात गमवायला लागला. कर्ज मागणाऱ्यांचे धमक्यांचे फोन आणि काही जण थेट घरापर्यंत यायला लागले. त्यामुळे घरात वाद-विवाद सुरु झाले. शेवटी रिना घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहचली.
पतीचे चार तरुणींशी प्रेमसंबंध
डॉ. सौरभ दोन वर्गमैत्रिणींशी प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती पत्नी डॉ. रिना हिला मिळाली. तिने दोन्ही डॉक्टर मैत्रिणींची समजूत घालून संसारात विघ्न न घालण्याची विनंती केली. मात्र, पती मानायला तयार नव्हता. तसेच हॉस्पिटलमधील एक महिला डॉक्टर आणि एका परिचारिकेशीही त्याचे प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आली. त्यापैकी एका डॉक्टर महिलेला तर लग्नाचेही आमिष दाखविल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पत्नीने डोक्यावर हात मारुन घेतला.
समूपदेशनाने संसार फुलला
डॉ. सौरभ विरुद्ध पत्नी डॉ. रिना ने रितसर लेखी तक्रार भरोसा सेलला केली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी त्याला भरोसा सेलमध्ये बोलावले. जयमाला बारंगे यांनी डॉ. सौरभ चे समूपदेशन केले. तो प्रेमप्रकरण असल्याचे मान्य करीत नव्हता. शेवटी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता सत्य स्थिती उघडकीस आली. त्यामुळे डॉ. सौरभ चारही तरुणींशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. त्या चारही तरुणींची पोलिसांनी समजूत घातली. त्या तरुणींनीही डॉ. सौरभ चा नाद सोडला तर त्यानेही प्रेमसंबंध संपविण्याचे वचन पत्नीला दिले. भरोसा सेलच्या प्रयत्नाने दोघांचाही सुखी संसार पुन्हा फुलला.