‘ जाको राखे साईया ‘ चा आला प्रत्यय

रागारागात घरा बाहेर पडलेला युवक 5 दिवस चिखल खाऊन जगला
‘ जाको राखे साईया ‘ चा आला प्रत्यय मगरीच्या तावडीतून बचावला
शिरढोण / नवप्रहार मीडिया
म्हणतात न की ‘ देव तारी त्याला कोण मारी ‘ याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील गावकऱ्यांना आला आहे. 11 व्या वर्गात शिकणारा युवक रागाच्या भरात घर सोडून निघून गेला होता. घरच्यांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याची चप्पल पंचगंगा नदीजवळ आढळली. त्यामुळे नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज आला आणि सगळ्यांचं काळीज धस्स झालं. सगळ्यांनी त्याचा शोध सुरू केला. तब्बल 5 दिवस त्याचा शोध सुरू होता. पण अखेरीस तो 5 व्या दिवशी एका 25 फूट खोल खड्ड्यात सापडला. धक्कादायक म्हणजे, नदीत मगरींचा वावर होता, अशाही परिस्थितीत तो चिखल खाऊन जगला.
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथं राहणाऱ्या आदित्य मोहन बंडगर याच्यासोबत घडलेली ही घटना आहे. आदित्य हा घरात एकुलता एक मुलगा आहे. दोन दिवसांपूर्वी घरामध्ये किरकोळ कारणावरून घरात वाद झाला. त्यामुळे आदित्यला राग आला आणि तो घरातून बाहेर पडला. घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर त्याची चप्पल आढळून आली. त्यामुळे घरच्यांच्या मनात पाल चुकचुकली. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर व्हाईट आर्मीच्या मदतीने आदित्यचा शोध सुरू केला. धक्कादायक म्हणजे, पंचगंगा नदीत मगरींचा मुक्त वावर आहे. तब्बल 8 फुटांच्या मगरी इथं पाहण्यास मिळतात. जेव्हा शोध मोहिम सुरू होती, त्यावेळी मगरी आढळून आल्या होत्या. पहिल्या दिवशी बुधवारी 7 तास त्याचा शोध घेण्यात आला. पण काहीच पत्ता लागलानाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत शोध मोहीम चालू होती. ही शोध मोहीम तब्बल 7 तास चालू होती. शोध मोहीम चालू असताना पंचगंगेच्या पात्रात दोन मगरी वावरताना दिसून आल्या. पाण्यात मगरी वावरताना दिसत होत्या पण मगर तरी आदित्यला घेऊन गेलेली नसेल अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती.
ड्रोनच्या मदतीने घेतला शोध
अखेरीस अभिजीत चव्हाण आणि सागर सुतार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं देखील आदित्यला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तरीही आदित्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. बऱ्याच दिवसांपासून शोध मोहिम सुरू असताना घरातील व्यक्तींनी आपापल्या पाहुण्यांकडे चौकशी केली असता तिथं देखील तो नसलेल्याची माहिती मिळाली. मग हा आदित्य गेला तरी कोठे काहीच कळेना.
…आणि आदित्यचा आवाज आला’
पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यचा शोध घेण्यासाठी बोट निघाली. बोटीने अखेरची फेरी मारण्यासाठी जात असताना अचानक आदित्यचा आवाज काणी पडला. आदित्यचा आवाज ऐकू येताच सगळे जण आवाजाच्या दिशेनं धावत सुटले. अखेरीस आदित्य हा नदी पात्रात जॅकवेलजवळ असलेल्या एका 25 फूट खोल खड्ड्यात पडलेला असल्याचं आढळून आलं. लगेच आदित्यला बाहेर काढण्यात आलं आणि त्याला सुखरुप त्याला घरी नेण्यात आलं. त्याची प्रकृतीही उत्तम असून अशक्तपणामुळे त्याच्यावर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदित्यला पोहोता येत होतं, त्यामुळे तो आतापर्यंत पाण्यावर तग धरून होता. पण त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे तो गाळामध्ये आणि केंदाळामध्ये अडकून पडला होता.
‘आदित्य चिखल खाऊन जगला’
मागील 5 दिवसांपासून आदित्य हा केंदाळामध्ये अडकून पडला होता. गावाला पाणी पुरवठा करणारे जॅकवेल पंचगंगेत आहे. याच जॅकवेलजवळ नेहमी मगरीचा वावर असतो. आदित्य 5 दिवस तिथं अडकून पडला होता. भुकेनं व्याकुळ झालेल्या आदित्यनं अक्षरश: चिखलं खाऊन भूक भागवली. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहीमेमध्ये प्रदिप ऐनापुरे, हैदरअली मुजावर, नितेश व्हणकोरे, निशांत गोरे यांनी मोलाची मदत केली. या टीमचं गावात कौतुक केलं जात आहे.