सामाजिक

दाण्यासाठी लिहिणे’ हिच प्रा. घरडे यांची गझल ध्येयात्मता – प्राचार्य डॉ. रमेश अंधारे

Spread the love

 

प्रा. घरडे यांच्या अल्काब मराठी गझलसंग्रहाचे थाटात लोकार्पण

अमरावती (प्रतिनिधी)
अंत:करणाच्या तळघरातून उसळलेली गझल ऐकणाऱ्याला गदगद करून सोडते. ती जेव्हा शृंगाररसाने थबथबलेली असते तेव्हा श्रोता मजनू रांझाचा देह पांघरूण अननुभूत अशा इश्काच्या गुहेत शिरतो आणि हीच गझल जेव्हा
गावकुसाबाहेरच्या जळत्या जगण्याची धग पेटवते तेव्हा मानसपातळीवरच्या
अनुभूतीलाही वीरबाहूचे फुटवे फुटतात. प्रत्येक गझलनवाजाच्या शायरीची एक गझलध्येयात्मता असते, तिच असते त्याच्या गझलाची नीजखूण किंवा टँगलाईन, आपल्या गझलेचं आत्मतत्व, तिचं सत्व तो मांडत असतो. त्याचं सबंध गजलगगन त्या आमुख गज़लेतून प्रगट होत असतं, गजलकार संजय घरडे यांच्या गझलेची ध्येयात्मता, “मी कुठे रे कधी कुणाला ,गाण्यासाठी लिहितो, मीठ भाकरी दुरडीतल्या दाण्यासाठी लिहितो ” .या शेरातून स्पष्ट झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीमटेकडी येथे गझलकार प्रा.संजय घरडे यांच्या ‘अल्काब’ या मराठी गझलसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्याचे बीजभाष्यकार म्हणून बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. वामन गवई, प्रमुख अतिथी आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’ गझलकार संजय घरडे, जयश्री घरडे, गझलगायक संजयकुमार मेश्राम, प्रा. डॉ. गजानन बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अंधारे म्हणाले की गजलेमध्ये नवीन प्रयोग होत असतात परंतु प्रा.संजय घरडे यांनी गज़लेतील शेरांची अर्धी ओळ मराठी तर अर्धी ओळ हिंदी असा नवीनच प्रयोग केला आणि एका नवीनच व्रुताला जन्म दिला आहे. याला ‘मही’ व्रुत नाव दिले असून या व्रुताचे जनकत्व प्रा संजय घरडे यांच्याकडेच जाते, गज़लेतून केलेल्या अनेक प्रयोगाने घरडे यांनी मराठी गजलेची शान वाढविली असल्याचेही डॉ. अंधारे म्हणाले .
आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके बोलताना म्हणाले की, गझलकार संजय घरडे हे एक आंबेडकरनिष्ठ जगण्याची भूमिका घेऊन पुढे आलेले गझलकार आहेत. त्यांची प्रत्येक गझल ऐकताना, वाचताना ऊर्जा मिळते. त्यांच्या ग़ज़लेतील आशय समाज प्रबोधन करण्यासाठी सज्ज असून मराठी गजलविश्वात एका प्रयोगशील चांगल्या आंबेडकरी गजलकाराची भर पडली. या प्रयोगशील ग़ज़लचे आणि ग़ज़लकाराचे वाचक,अभ्यासक निश्चितच स्वागत करतील असे ही ते म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. वामन गवई यांनी प्रा. संजय घरडे यांच्या कार्य शैलीची त्यांच्या हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तीमत्वाची, त्यांच्या कविता गझल सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. गज़लेला सुलतानाच्या दिवाणखान्यातून बाहेर काढून मानवी जीवन जाणिवांपर्यंत पोहचवण्याचे श्रेय आंबेडकरी ग़ज़लकारांना जाते. त्यात संजय घरडे हे नाव अग्रणी राहिल असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागृतीचा अग्नी तेवत ठेवणाऱ्या लेखणीला मशालीगत प्रज्वलित करून लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अल्काब या गजलसंग्रहाचे लोकार्पण तसेच अल्काब गझलसंग्रहावर आधारित साप्ताहिक वज्जीसंदेशच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.संजय घरडे यांनी ‘अल्क़ाब’ च्या जडणघडणीत सहभागी असणाऱ्या सर्वाचे आभार आपल्या मनोगतातून मांडले.
यावेळी अल्क़ाब चे मुखपृष्ठ साकारणारे प्रसिद्ध चित्रकार प्राचार्य मनीष चोपडे, अक्षर मांडणी करणारे अथर्व ग्राफिक्सचे गजानन ढोले, गाथा प्रकाशनचे संचालक विलास थोरात, गजलकार प्रा .संजय घरडे व आयु.जयश्री घरडे यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मोखडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ .गजानन बनसोड यांनी केले, विलास थोरात यांनी मान्यवरांसह उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अल्काब या गझलसंग्रहातील निवडक गज़लांचे गायन सुप्रसिद्ध गज़लगायक संजयकुमार मेश्राम (रामटेक) नागपूर यांनी केले तर शीतल मांडवगडे (तबला), अतुल सुंदरकर (हार्मोनियम), चेतन वानखडे (बासरी) हरिश लांडगे (व्हायोलीन), रवी इंगोले (कि-बोर्ड) तर निलेश गायकवाड (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. तसेच सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवयित्री स्नेहल सोनटक्के यवतमाळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक संबोधी डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्टडी सर्कलचे सर्व अभ्यासक ,गाथा प्रकाशन ,शिल्पकार फाऊंडेशन ,आणि वज्जीसंदेशच्या परिवार यांचेसह प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, सुदामजी सोनुले, नारायण थोरात, गणेश थोरात, सिध्दार्थ गेडाम, धर्मशील गेडाम,डॉ .जलदा ढोके ,मायाताई वासनिक,अश्विनी गडलिंग, राजेश गरुड , रवीन्द्र नंदागवळी,प्रवीण इंगोले, देवेंद्र कळमकर, समाधान बडगे, निलेश देवगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close