संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज असावे- डॅा.पंकज आशिया
मान्सुन पुर्व तयारी आढावा बैठक
यवतमाळ, दि.17 (जिमाका) : मान्सुन काळात विविध प्रकारचे आपत्तीजनक प्रसंग घडण्याची शक्यता असते. असे प्रसंग ओढवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज असले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पुर्व तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
मान्सून काळात नदी नाल्यांना पुर येऊन नुकसान होण्याची शक्यता असते. जिल्ह्यात पुरामुळे बाधीत होणारी 169 इतकी गावे आहेत. त्यातील 53 गावे अतिसंवेदनशिल आहेत. या गावांना पुरामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता पाहता संबंधित विभागांनी पुर्वीपासूनच आवश्यक उपाययोजना तयार ठेवल्या पाहिजे. नदी नाल्यांमधीन पुरप्रवाह सुरळीत होण्यासाठी त्यातील अडथळे, साफसफाई व गाळ काढण्यात यावा. प्रत्येक धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नदी, नाल्याच्या काठावरील अतिक्रमने काढून टाकावे. शहरातील धोकादायक ईमारती खाली करण्याबाबत संबंधितांना सूचित करावे. मान्सून काळात नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु ठेवावा. उपविभाग व तहसिलस्तरावर शोध व बचाव पथके तयार करावीत. या पथकांना बोटी चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे व आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. पुरग्रस्त भागातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मान्सूनच्या आपत्तीकाळात विद्युत पुरवठा, दुरध्वनी, रस्ते व पुल सुरु राहतील याची दक्षता घेतली जावी. आवश्यक असलेले मदत साहित्य, अत्यावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध ठेवावा. पुरपरिस्थीत निर्माण झाल्यास अशावेळी वैद्यकीय समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, ते पाहता आवश्यक औषधी साठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची सज्जता, रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छ, रोगनियंत्रण यंत्रणा व उपाययोजना याचा आराखडा तयार करण्यात यावा.
पुरपरिस्थितीत पिण्याचे पाणी दुषीत होण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांना शुध्द पाणी उपलब्ध झाले पाहिजे. धान्याचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घेतली जावी. पुरपरिस्थितीत वीज खांबांचे नुकसान होऊन वीज पुरवठा खंडीत होणार नाही, यादी दक्षता घेतली जावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.