12 लोकांना यमलोक पोहचविणाऱ्या मांत्रिकाचा कस्टडीत मृत्यू
अहमदाबाद / नवप्रहार डेस्क
रक्कम चारपट करण्याचे आमिष देऊन लोकांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि नंतर त्यांना सोडियम नायट्रेट देऊन त्यांना यमलोक ( स्वर्ग ) दाखविणाऱ्या मांत्रिकाचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला आहे। त्याच्यावर 12 लोकांना मारण्याचा आरोप आहे. अहमदाबादमध्ये एका फॅक्ट्री मालकाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून या मांत्रिकाला अटक करण्यात आली होती. नवलसिंह चावडा असं त्याचं नाव होतं.
पाच दिवसांपूर्वी नवलसिंह चावडा याला सरखेज पोलिसांनी अटक केली होती, पण पोलीस कस्टडीमध्ये असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. नवल सिंह चावडा याने सोडियम नायट्रेट देऊन 12 हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला होता. या 12 हत्यांमध्ये मांत्रिकाची आई, काकी आणि आजीचाही समावेश आहे. नवलसिंह चावडा याला पोलिसांनी 3 डिसेंबरला अटक केली होती, यानंतर कोर्टाने त्याला पोलीस कोठडी दिली होती.
नवलसिंह चावडा याला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नवलसिंह चावडा मांत्रिक होता आणि त्याच्या मांत्रिक क्रियांच्या माध्यमातून त्याने 12 हत्या केल्या होत्या, हे तपासात समोर आलं होतं. या प्रत्येक हत्येसाठी त्याने सोडियम नायट्रेटचा वापर केला होता. पोलीस कस्टडीमध्ये असताना अचानक नवलसिंग चावडा याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.
सोडियम नायट्रेट पावडरच्या रुपात असतं, या पावडरचा एक चमचा पाण्यात मिसळला आणि ते पाणी प्यायला दिलं तर माणसाचा 20 मिनिटांमध्ये मृत्यू होतो. एकदा सोडियम नायट्रेट खाल्ल्यानंतर माणूस जिवंत राहण्याची शक्यता अजिबात नसते. नवलसिंगने पैसे चौपट करण्याचं आमिष दाखवून दारूमध्ये सोडियम नायट्रेट मिसळायचा आणि प्यायला द्यायचा. यानंतर तो पैसे आणि दागिने लुटून पसार व्हायचा.
टॅक्सी ड्रायव्हरमुळे उलगडलं षडयंत्र
एका टॅक्सी ड्रायव्हरने नवलसिंग चावडाबाबत पोलिसांना माहिती दिली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. साणंदच्या परमग्रिल बंगल्यामध्ये राहणाऱ्या अभिजीत सिंह राजपूत यांची चांगोदरमध्ये एक फॅक्ट्री आहे. एकाचे चार करण्याचं आमिष दाखवून नवलसिंगने अभिजीत यांना 15 लाख रुपये घेऊन सनाथल भागात बोलावलं होतं. अभिजीत यांना सोडियम नायट्रेट देऊन त्यांची हत्या करण्याची योजना नवलसिंगने बनवली होती.
नवलसिंगकडे मांत्रिक विद्या आहेत यातून तो संपत्ती चौपट करतो असं अभिजीत यांना त्यांच्या नातेवाईकाने सांगितलं होतं. यानंतर 30 नोव्हेंबरला अभिजीत यांनी नवलसिंगला भेटायला बोलावलं. अभिजीत नवलसिंगला भेटायला त्यांची सफारी कार घेऊन त्याच्या घराजवळ गेले होते. यानंतर दोघांनी कारमध्ये बसून चर्चा केली आणि नवलसिंगने अभिजीत यांना 1 डिसेंबरला पैसे आणि दागिने घेऊन सनाथल भागात बोलावलं.
अभिजीत यांच्या ड्रायव्हरला याबाबत संशय आला आणि त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. याआधी अभिजीत यांच्या ड्रायव्हरच्या भावाचाही नवलसिंगच्या जाळ्यात अडकून 2021 साली संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.
दुसरीकडे नवल सिंगने वाधवानहून अहमदाबादला आलेला त्याचा दूरचा मेव्हणा जिगर यालाही अभिजीत यांची हत्या करण्याच्या षडयंत्रात सहभागी करून घेण्याची योजना आखली. 2 महिन्यांपूर्वी नवल सिंगने जिगरला सांगितले की, तू कार चालवून श्रीमंत होणार नाहीस, त्यापेक्षा तू मला साथ दे, त्यानंतर त्याने जिगरला या योजनेबद्दल अधिक माहिती दिली. त्याच्या प्लाननुसार, जेव्हा अभिजीत गाडीत पैसे घेऊन येईल तेव्हा गाडीत असलेली पावडर पाण्यात मिसळून त्याला प्यायला द्यायची. या पावडरमुळे तो एकतर बेशुद्ध होईल किंवा त्याचा अपघात होईल किंवा हृदयविकाराचा झटका येईल, नंतर तो पैसे घेऊन फरार व्हायचं.
या सगळ्यात जिगरला 25 टक्के कमिशन देण्यासही नवलसिंग तयार झाला. मात्र, ओला-उबर चालवणाऱ्या जिगरला अशा गुन्हेगारी कृत्यात पडायचे नव्हते, म्हणून त्याने पोलिसांना ही सर्व माहिती देऊन व्यावसायिक अभिजीत सिंगना वाचवले. या संपूर्ण घटनेबाबत अभिजीत सिंग यांनी सरखेज पोलीस ठाण्यात नवल सिंग विरोधात तक्रार दाखल केली होती, पोलिसांनी आरोपीला अटक करून कार आणि पावडर जप्त केली.
नवलसिंगचा पोलीस कोठडीत आकस्मिक मृत्यू झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. चौकशीदरम्यान नवलसिंगची तब्येत अचानक बिघडली, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे त्याचा मृत्यू झाला. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मांत्रिकाला अन्य एका मांत्रिकाकडून अशा टिप्स मिळाल्याचंही तपासात समोर आलं आहे. यासोबतच वडवानमधल्या एका लॅबमधून नवलसिंग सोडियम नायट्रेट विकत घेत असल्याचंही समोर आलं आहे, याचा तपासही पोलीस करत आह