जामिनीवर असलेल्या आरोपीची गैरवर्तवणूक ; न्यायालयाने दाखवला इंगा

जामीन रद्द करून तुरुंगात केली रवानगी
गडचिरोली / प्रतिनिधी :
जुन्या वादातून आपल्या काकाला डोक्यावर काठीने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. परंतू गावात आल्यानंतर आरोपीने पुन्हा काकाला जिवे मारण्याची धमकी देणे सुरू केल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा जामिन रद्द करून पुन्हा कारागृहात पाठवले. ही घटना आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे घडली. अमोल उद्धवराव साखरे (वय ३४), असे आरोपीचे नाव आहे.
जुन्या वादातून अमोल साखरे याने २५ एप्रिल रोजी आपल्या काकावर काठीने प्रहार करून गंभीर जखमी केले होते. त्याला पोलिसांनी भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून अटकही केली. पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. पण ३१ आॅगस्ट रोजी अटी व शर्तीच्या अधिन राहून न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र आरोपी अमोल साखरेने अटी-शर्तींना न जुमानता काकाला पुन्हा मारून टाकण्याच्या धमक्या देणे सुरू केले. त्यामुळे यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमोलचा जामिन रद्द करून त्याला पुन्हा चंद्रपूरच्या कारागृहात पाठविले.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड.अनिल प्रधान, अॅड.उमेश कुकडकर यांनी युक्तीवाद केला.