डॉक्टरकीच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही:दर्यापूरात 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; नीट परीक्षेची करत होती तयारी

दर्यापूर (किरण होले)
दर्यापूर शहरातील गांधीनगर येथील रहिवासी बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. त्याच अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सायली विलास नवलकार (वय १७ ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.
सायलीने अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीच्या प्रवेशाची तयारी सुरु केली होती. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचे असल्याने ‘नीट’ परीक्षेचाही अभ्यास सुरु केला होता. परंतु त्यासाठीचा खर्च कुटुंबाला झेपणार नाही, याची चिंता तिला सतावत होती. तसा उल्लेखही तिने आत्महत्या करण्यापूर्वी डायरीत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इयत्ता अकरावी उत्तीर्ण होऊन सायली यावर्षी बारावीत गेली होती. याच महिन्याच्या अखेर तिचे बारावीचे शैक्षणिक सत्र सुरु होणार होते.
घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती. कुटुंबातील सदस्य अकोला येथे नातेवाईकाच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाठी गेले होते. या कार्यक्रमात सायली सहभागी झाली होती. परंतु परतताना शुक्रवारी दुपारी ती कुटुंबातील सदस्यांआधी निघालेल्या काकाच्या कुटुंबीयांसोबत परत आली. दरम्यान तिला घरी सोडून काका गावी निघून गेले. घटनेच्यावेळी सायलीचा भाऊ जिममध्ये गेला होता. याचवेळी तिच्या मनात विचारांचे काहूर माजले आणि घरात एकटी असताना तिने छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सायली हुशार विद्यार्थिनी होती. तिला दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळाले होते. तिला डॉक्टर व्हायचे असल्याने ती नीटचा अभ्यास करीत होती. परंतु वडिलांची परिस्थिती, पुढील शिक्षणाकारिता लागणारा खर्चाची चिंता तिला सतावत होती. आत्महत्येपूर्वी तिने तिच्या डायरीत तसे लिहिले आहे. सायलीच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. दर्यापूर पोलिसांनी घटनेची नोंद करून मर्ग दाखल केला आहे.