किडनी ” रॅकेट पकडण्यात पोलिसांना यश

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
किडनी देण्याच्या मोबदल्यात 30 लाख रुपये देण्याचे आमिष देत रिक्षा चालकाची किडनी काढुन घेत त्याला फक्त 1.1 लाख रुपये देऊन त्याची बोळवण करण्यात आल्याचा धककडायक प्रकार आंध्रप्रदेश च्या विजयवाडा येथे घडला आहे. पैशे न मिळाल्याने रिक्षा चालकाने पोलिसात धाव घेतल्याने हे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सात लोकांना अटक केली आहे.
आंध्रप्रदेशमधील गुंटूर येथे राहणाऱ्या मधूबाबू (31) नामक रिक्षाचालकाला या रॅकेटने गंडा घातला. किडनी दान करण्याच्या बदल्यात 30 लाख रुपये दिले जातील, असे सांगून रिक्षाचालकाची फसवणूक झाली. त्याला फक्त 1.1 लाख रुपये देण्यात आले. आता फसवणुकीप्रकरणी मधूबाबूने विजयवाडा पोलिसांत धाव घेतली आहे.
मधूबाबू याने ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲपकडून कर्ज घेतले होते. हा कर्जाचा बोजा त्याला कमी करायचा होता. तसेच मुलांच्या शिक्षणासाठीही त्याला पैसे हवे होते. यादरम्यान त्याला फेसबुकवर किडनी प्रत्यारोपणाच्या बदल्यात मोठी रक्कम देणारी जाहिरात दिसली. किडनीच्या बदल्यात 30 लाख रुपये मिळतील, असे आमिष जाहिरातीद्वारे दाखविले होते. 30 लाख रुपये मिळाले तर आपल्या अनेक समस्या सुटतील, असे वाटून मधूबाबूने जाहिरातीवर दिलेल्या क्रमांकावर फोन केला. पण इथूनच त्याच्या मागचे शुक्लकाष्ठ सुरू झाले.
मधूबाबूने संपर्क केल्यानंतर त्याची ओळख विजयवाडामधील बाशा नावाच्या व्यक्तीशी झाली. तसेच विजयवाडा येथील एका महिलेची भेटही मधूबाबूशी घालून दिली. या महिलेने किडनी दान केल्यानंतर तिला कसे पैसे मिळाले, याचा अनुभव तिने सांगितला. त्यामुळे आपल्यालाही असेच चांगले पैसे मिळतील असा विश्वास मधूबाबूला वाटला. त्यानंतर विजयवाडा येथील विजया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. समोरच्या रुग्णाला तातडीने किडनीची गरज असल्याचे त्याला भासविण्यात आले. तसेच शस्त्रक्रियेआधी त्याला प्रवासाचा आणि इतर खर्च देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर उरलेले पैसे देऊ असेही त्याला सांगितले.
नोव्हेंबर 1023 ते जून 2024 या काळात मधूबाबूला एकून 1.1 लाख रुपये देण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर ठरल्याप्रमाणे 30 लाख रुपये काही मिळाले नाहीत. ठरलेले पैसे मिळाले नाही म्हणून मधूबाबूने तगादा लावताच त्याल धमकावण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मधूबाबूने पोलिसांकडे तक्रार केली.
मुलांच्या भवितव्यासाठी घेतला होता निर्णय
मधूबाबूने पोलिसांना सांगितले की, त्यांनी माझ्या आर्थिक अडचणीचा फायदा घेतला. किडनी दान करून मी कुणाची तरी मदत करतोय, असे मला भासवण्यात आले. मी किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी तयार झालो कारण मला वाटले. या पैशातून मी माझे कर्ज फेडू शकेन. तसेच माझ्या मुलांच्या शिक्षणाची तजवीज यातून करू शकेन.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. किडनी दान केल्याचा अनुभव सांगणारी महिला आणि ज्या कुटुंबाला किडनी हवी म्हणून समोर उभे केले, ते दोघेही बोगस असल्याचे चौकशीत समोर आले. तसेच मधूबाबूची डावी किडनी काढण्याचे ठरले असताना त्याची उजवी किडनी काढली गेली. या प्रकारात डॉ. शरद बाबू आणि त्यांच्या रुग्णालयातील डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे समोर आले.