छंदच बनला मृत्यूचे कारण ; जगप्रसिद्ध स्टंटमॅन चा मृत्यू
हॉंगकॉंग / नवप्रहार मीडिया नेटवर्क
काही वेळा माणसाला ज्या गोष्टीचा छंद असतो तेच त्याच्या मृत्यूचे कारण बनतो असे म्हटल्या जाते.कारण काही प्रकरणात असे पाहण्यात आले आहे की सर्पमित्र असलेल्या व्यक्तीचा सर्पदंशानेच मृत्यू झाला आहे. जगात स्टंटमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या रेमी ल्युसिडी याचा स्टंट करतांना उंच ईमरातीवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
३० वर्षीय फ्रांसीसी डेयरडेविल हाँगकाँग येथील एका ६८ मजली उंच इमारतीवरुन पडल्याने मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली . साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार ल्युसिडी हा ट्रेंगुंटर टॉवर कॉम्प्लेक्सवर चढत होता. मात्र, या इमारतीवर चढत असताना पाय घसरुन खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
रेमीने ल्युसिडीने मृत्यूच्या एक तास आधी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, रेमीच्या मृत्यूबद्दल अनेकांकडून हळहळ व्यक्त करत त्यास श्रद्धांजलीही अर्पण करण्यात येत आहे. ३० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली. रेमी ल्युसिडीला अनेकांनी इमारतीवर जाताना पाहिले होते. टॉवरमध्ये प्रवेश करत असताना त्याला गेटवरील सुरक्षा रक्षकाने अडवले होते. मात्र, सुरक्षा रक्षकाशी खोटं बोलून त्याने टॉवरमध्ये प्रवेश केल्याचेही आता समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून रेमीने मदतीसाठी हात मागितल्याचे दिसून येते. रेमी ४९ व्या मजल्यावर येताना आणि नंतर इमारतीच्या वरच्या पायऱ्या चढताना दिसला. त्यानंतर, तो संध्याकाळी ७.३८ वाजता कॉम्प्लेक्समधील पेंटहाऊसच्या खिडकीवर मदतीसाठी हात ठोठावताना दिसला. मात्र, ते पाहून तिथे काम करणारी मोलकरीण घाबरली. तर, तिला पाहून रेमीही घाबरला आणि त्याचा पाय घसरला, अशी माहिती तेथील मीडियाने दिली आहे. तर, त्याच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी, त्याने हाँगकाँगच्या आकाशाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. सध्या हा फोटो व्हायरल झाला आहे.
वॉचमन शी खोटे बोलला ?
तो ४० व्या मजल्यावर आपल्या मित्राला भेटण्यासाठी आल्याचं त्याने म्हटलं होतं. मात्र, संबंधित मित्राने ओळख न दाखवल्यामुळे रेमी ल्युसिडी खोटं बोलत आहे, हे तेथील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर, सुरक्षा रक्षकाने त्याला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तो लिफ्टमध्ये शिरला होता.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी ल्युसिडीचा कॅमेरा सापडला. या कॅमेऱ्यात त्याने आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी स्टंट केले त्याचे अनेक व्हिडीओ आहेत. पोलिसांनी मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप जाहीर केले नाही.