शेतीतील मोटर केबल चोरी करताना शेतकऱ्यांनी चोरट्याला पकडले रांगेहात
L
शेतकऱ्यांनी पोलिसात केली तक्रार; आरोपी अटक
दर्यापूर (किरण होले)
दर्यापूर तालुक्यातील टाकळी व मुर्तीजापुर तालुक्यातील लाखपुरी येथील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत वायर कापून चोरी करताना एक चोरट्याला शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून त्याला चांगला चोप दिला आहे. या चोरट्याने तब्बल दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत वायरची चोरी केल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी शकील जलील शहा (वय २७ वर्ष, रा. बाभळी दर्यापूर असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे . त्याने पूर्णा नदीपात्रावर लावण्यात आलेल्या शेतीच्या मोटर पंपावरील विद्युत वायर कापून चोरी केल्याची
कबुली दिली आहे.२३ मे च्या सायंकाळची ही घटना असून लाखपुरी गावाजवळून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
लाखपुरी गावाजवळ एक संशयित इसम दुचाकीने शेतीचे विद्युत मोटर केबल घेऊन जात असताना शेतातील रखवालदार यांना दिसला व त्यांनी त्या चोरट्याला पकडून ठेवत शेतकऱ्यांना फोन करून बोलावले व घटनास्थळी टाकळी व लाखपूरी येथील शेतकऱ्यांनी धाव घेत त्या चोरट्याला पकडून आधी चांगला चोप दिला व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
विशेष म्हणजे या चोरीमध्ये तब्बल दोन ते तीन चोरटे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे मात्र यातील फक्त एका चोराला पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्यांनी चोरट्याला रंगेहात अटक केल्यानंतर त्याच्या जवळील विद्युत वायर सुद्धा जप्त केले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटने नंतर शेतकऱ्यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शकील जलील शहा याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या घटनेतील आणखी ते दोन आरोपी कोण ? याचा शोध आता पोलीस लावणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.