भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या
अमेरिका / नवप्रहार डेस्क
मुळचे आग्रा येथील आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या तरुणाची अमेरिकेच्या इंडियांना प्रांतात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी त्यांची पत्नी त्यांच्या सोबत होती. गेविन दसौर (वय २९) आपल्या पत्नीसह घरी जात असताना ही घटना घडली. त्यांचा पिकअप चालकाशी झालेल्या शुल्लक वादानंतर पिकअप चालकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आणि त्यांचा मृत्यू झाला.
दसौर यांची पत्नी मेक्सिकन असून त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. दसौर हे उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील रहिवासी होते. त्यांचे विवियाना झमोरा यांच्याशी २९ जून रोजी लग्न झाले होते. पण दुर्दैवाने लग्नाच्या दोन आठवड्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडियाना पोलीस विभागाच्या अधिकारी अमांडा हिब्सचमैन यांनी सांगितले की, इंडी शहराच्या दक्षिण पूर्व क्षेत्रातील चौकात रस्त्यालगत एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना दसौर यांचा मृतदेह आढळून आला. तसेच त्यांच्या पत्नीने झालेला प्रसंगही कथन केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या पतीला वाचविण्याची धडपड पत्नी विवियाना यांनी केली. मात्र रुग्णवाहिकेची वाट पाहत त्यांना तिथेच थांबावे लागले.
पिकअप चालकाशी क्षुल्लक भांडण आणि जीव गमावला
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दसौर आणि पिकअप वाहनाच्या चालकामध्ये भांडण झाल्यानंतर गोळीबार झाला. संशयित आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या प्रवक्यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपीला जामीनावर मुक्त करण्यात आले. आरोपीला सोडल्यामुळे असे दिसते की, त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. दसौर यांच्या पत्नीने मात्र या जामीनाचा विरोध करत त्यावर टीका केली.
फॉक्स न्यूजने या घटनेचे वार्तांकन करताना सांगितले की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका वाहनातील चालकाने या घटनेचे मोबाइल चित्रीकरण केले. ज्यामध्ये दसौर आपल्या वाहनातून उतरून पिकअप वाहनाकडे जाताना दिसतात. ते खूप रागात असल्याचे त्यांच्या हावभावावरून दिसते. पिकअप वाहनाच्या चालकावर ते ओरडत असल्याचे दिसत असून त्यांनी चालकावर बंदुकही रोखली. तसेच पिकअप वाहनाच्या दारावर त्यांनी हातही मारला.
सात सेकंदाचा घटनाक्रम
यानंतर ते चालकाकडे रोखलेली बंदूक खाली घेतात. तेवढ्यात पिकअपमधील चालक त्यांच्यावर गोळी झाडतो. चालक दसौर यांच्यावर तीन गोळ्या झाडतो. ज्यामुळे दसौर जमिनीवर कोसळतात. अवघ्या सात सेकंदात ही घटना घडते. पिकअपचा चालक मात्र गोळीबारानंतरही गाडीच्या बाहेर येत नाही.