लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा आणणाऱ्यांना जोडा मारा – कोण म्हणले असे ?

दिवाळी चे फटाके संपण्यावर आहे. राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने आता प्रचाराने वेग धरला आहे त्यामुळे राजकीय फटाके फुटायला सुरवात झाली आहे.कुर्ल्यात आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेत ‘ लाडक्या बहीण योजनेत खोडा आण्णांऱ्यांना जोडा मारा ‘ असा टोला लगावला.
आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती होतांना पाहायचं आहे. आता तुम्हाला फक्त वर्षाला भाऊबीज मिळणार नाही, तर दर महिन्याला भाऊबीज मिळेल, असं म्हणत लाडक्या बहीण योजनेला विरोधक विरोध करत आहेत. मात्र, या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवेल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराची पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे अनेक विषयांवर भाष्य केलं. कुर्ल्यात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांचा विजय निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार तसेच येत्या 23 नोव्हेंबरला अॅटम बॉम्ब फुटणार, असं भाकीतही एकनाथ शिंदेंनी केलं. यावेळी बोलतांना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. एवढे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल. मंगेश कुडाळकर गेल्या वेळी 24 हजार मतांनी निवडून आले होते. आता तुम्हाला त्यांना 50 हजार मतांनी विजयी करायचे आहे. मंगेश कुडाळकर यांचा विजय निश्चित आहे. मी त्यांचे आधीच अभिनंदन करतोय. आता काही लवंगी फटाके फुटत आहेत. दिवाळी आहे. पण, आपला २३ तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार, असा दावाही शिंदेंनी केला.
ते म्हणाले, आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे. आता लाडक्या बहिणींना वर्षाला नाही तर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. विरोधक म्हणतात की लाडकी बहिण योजना बंद होईल, आम्ही महिलांना विकत घेतलं, असं म्हणतात. पण, लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरमध्ये दिले. आता डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ… या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवणार. ते या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले, पण कोर्टाने त्यांनाच चपराक दिली. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आपल्याला दर महिन्याचा माहेरचा आहेर मिळणार, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक
यावेळी बोलतांना त्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी खटाखट म्हणाले होते, त्यांनी व्होट घेतले. मात्र, आता पैसे नाही म्हणतात. हिमाचलमध्ये योजना सुरू करून बंद केली. राजस्थानमध्ये शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. आधीच सरकार वसुली सरकार होतं, त्यांनी अडीच वर्षात फक्त वसुली मारली. मात्र, आपल्या अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारं सरकार आहे. आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यातले नाही, आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक आहोत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.