श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले वारकरी सेवा भूषण पुरस्काराने सन्मानित
[विदर्भ वैभव मंदिर कडूनही भावपूर्ण सत्कार]
अकोला / प्रतिनिधी
: वारकरी संप्रदायामध्ये विविध माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वांचा गौरव व त्यांचा सन्मान श्री वारकरी प्रबोधन महासमिती, मुंबई द्वारा करण्यात येत असतो. यावर्षी हा सन्मान श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोटचे अध्यक्ष श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले यांना “श्री संत हैबतराव बाबा सेवा भूषण वारकरी पुरस्कार २०२४” श्री विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती, शाल,श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
हा सन्मान श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या द्वितपपूर्ती तसेच श्री पांडुरंग भव्य पालखी सोहळा व सत्कार समारंभ, मुंबई येथे संपन्न झाला.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थापक अध्यक्ष श्री रामेश्वर महाराज शास्त्री यांनी
प्रास्ताविकातून सोहळ्यासंबंधी कल्पना दिली. मुंबईतला वारकरी एकत्र करणे आणि मुंबईतील पाप नामस्मरणाने दूर करणे, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा आयोजित करण्यात आला. मुंबईमध्ये सर्व प्रकारचे लोक व्यवसाय निमित्त एकत्र येतात. सर्वांना आदर मिळाला पाहिजे. वारकरी प्रबोधन महासमितीने चंद्रभागा स्वच्छ केली. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. श्री गुरु संत वासुदेवजी महाराज यांनी वारकरी संप्रदायाची अखंड सेवा केली. सांप्रदायामध्ये त्यांचे फार मोठे आदराचे स्थान आहे. वारकरी संप्रदाय जगामध्ये पोहोचावा, त्यासाठी वारकरी विद्यापीठ झाले पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे यांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना श्री महल्ले महाराजांनी श्री संत तुकाराम महाराज, श्री संत हैबत बाबा, श्री संत वासुदेव महाराज, आदी संतांच्या कार्यावर व माऊलींचे सिद्धबेट यावर प्रकाश टाकला. श्री संत वासुदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या अडी-अडचणी दूर व्हाव्या यासाठी शेवटपर्यंत अखंड अथक प्रयत्न केले. वारकरी सेवा भूषण पुरस्काराद्वारे हा जो माझा सन्मान करण्यात आला हा माझा सन्मान नसून सर्व वारकरी भाविकांचा सन्मान आहे. मी या सन्मानाच्या योग्यतेचा नाही, अशी विनम्र भूमिका मांडून अखेरपर्यंत सर्व संतांची व श्रीगुरुंची सेवा घडावी, हे सर्व साधुसंत, वारकरी, महाराज मंडळींच्या समक्ष मागणं मागितलं.
याप्रसंगी खासदार श्री अरविंद सावंत, आमदार श्री अजय चौधरी, दैनिक सामनाचे दीपक शिंदे,नवनाथ महाराज आंधळे, अशोक महाराज सूर्यवंशी, बाबा महाराज मिसाळ, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच, मुंबई व परिसरात विविध दिंड्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यानंतर दादर परिसरामध्ये भव्य पालखी सोहळा, सर्व सत्कारमूर्तींनी पांडुरंगाची पालखी खांद्यावर घेऊन भक्ती सोहळ्याचा आनंद लुटला. तद्नंतर सर्व सत्कारमूर्तींना पांडुरंगाच्या रथामध्ये बसवून शोभायात्रा काढण्यात आली. रिंगण सोहळ्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. विविध वारकरी संत भक्तगण महाराज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांसोबतच श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे विश्वस्त मंडळातर्फे महादेवराव ठाकरे, अशोकराव पाचडे, गजाननराव दुधाट, व्यवस्थापक अमोल मानकर, तसेच साहेबराव मंगळे, समाजसेवक गजानन हरणे, योगेश भडांगे, आदींची उपस्थिती होती.
विदर्भ वैभव मंदिर कडूनही भावपूर्ण सत्कार
मुंबईमध्ये विविध सेवाभावी सामाजिक कार्य करणारे विदर्भ वैभव मंदिर, मुंबई ट्रस्ट द्वारा वारकरी सेवा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महल्ले महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री महल्ले महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विदर्भ वैभव मंदिर ट्रस्टचे अशोक बारब्दे, गजानन नागे, संजीव बारब्दे, प्रकाश ढोकणे, सुधाकर साबळे, नवनीत भोजने, राजेश्वर चौधरी, दिनेश देशमुख, आदी विश्वस्त मंडळींसह असंख्य मुंबईकरांची उपस्थिती होती.