राज्य सरकार व अधिका-यांच्या संगनमताने शेतक-यांची लुट
बियाण्यांमध्ये लुट करणा-या कृषी केन्द्र चालकांना चोप देऊ
देवानंद पवार यांचा इशारा
प्रतिनिधी यवतमाळ
राज्यातील सुलतानी सरकारच्या कारभाराने तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात आलेल्या शेतक-यांची खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी केन्द्र चालक लुट करीत आहे. बि बियाणे तसेच खतांची दुप्पट भावाने विक्री केली जात असतांना सरकार मात्र कुठलीच कारवाई करायला तयार नाही. शेतक-यांनी या संदर्भात सजग राहुन लुट करणा-या कृषी केन्द्र चालकांची नावे आम्हाला कळवावी आम्ही त्यांना चोप देऊन वठणीवर आनू असा इशारा प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षापासून राज्यातील शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण तसेच नैसर्गीक आपत्तीमुळे शेतक-यांना सतत नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीसुध्दा अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. अशात सरकारने सुध्दा नुकसान भरपाई दिली नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतक-यांनी आता खरीप हंगामाची पेरणी सुरु केली आहे. मात्र सरकारच्या आशिवार्दाने कृषी केन्द्र चालकांनी साखळी करुन शेतक-यांची लुट चालविली असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहे. अनेक कृषी केन्द्र चालक तर मालच नसल्याचे सांगत चौपट दराने बि बियाणे तसेच खते विकत आहे. काही विक्रेते बोगस बियाणे सुध्दा शेतक-यांच्या माथी मारत असल्याच्या तक्रारी आहे. अत्यंत हलाखीचे जीवन जगणा-या शेतक-यांना लुटण्याचे पाप अधिकारी तसेच कृषी केन्द्र चालक कुठे जाऊन फेडतील. संकटात सापडलेल्या शेतक-यांना मातीत घालण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. शेतक-यांनी अशा कृषी केन्द्र चालकांची नावे आम्हाला कळवावी आम्ही त्यांना शेतीच्या बांधावर नेऊन बदडू असा इशारा देवानंद पवार यांनी दिला आहे.
कारवाई करा अन्यथा आंदोलन
शेतक-यांची खुलेआम लुट होत असतांना सरकारी यंत्रना गप्प बसून आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
देवानंद पवार
प्रदेश सरचिटणीस, कॉग्रेस