जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना ; एक गंभीर
नागपूर / विशेष प्रतिनिधी
जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत.एक घटना कन्हान तर दुसरी खापरखेडा येथे घडली आहे.या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपत्तीच्या वादातून निखिल पासवान या २७ वर्षिय तरुणाची हत्या झाली, तर कन्हानमध्ये शुल्लक कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की चौघांनी मिळून दोन भावांवर जीवघेणा हल्ला केला. त्यात मोठ्या भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लहान भाऊ मृत्यूशी झुंज देत आहे. जयराज भीमराव गायकवाड (३६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर युवराज गायकवाड गंभीर जखमी झाले आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे संपत्तीच्या वादातुन एकाच कुटुंबातील दोन गट एकमेकांशी भिडले त्यामुळे जोरदार हाणामारी झाली. हा वाद शांत झाल्यानंतर हाणामारीत सहाभागी असलेल्या एकाने निखिल पासवान या तरुणाच्या पोटावर चाकूने वार केले ज्यात निखिलचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. धक्कादायक म्हणणे ज्या आरोपीने निखिलची हत्या केली तो पासवान कुटुंबाचा सदस्य नाही. राहुल राजन सूर्यवंशी असे आरोपीचे नाव आहे त्याच्या मनात निखिलच्या कुटुंबाविषयी प्रचंड राग होता, त्यातून त्याने निखिलची हत्या केली ही बाब उघड झाली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दुसरी घटना ही कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर शिवारातील शितला माता मंदिराजवळ घडली. जुन्या वादातुन जयराज भीमराव गायकवाड नामक तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली. जयराज आणि युवराज या दोघांचा आरोपी भेंडंग पुरवले, देवेंद्र भेडंग पुरवले, साहिल भेडंग पुरवले यांच्याशी जुना वाद होता. काल दुपारी त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. तो इतका विकोपाला गेला की वडील आणि दोन मुलांनीजयराज आणि युवराज गायकवाडवर चाकु व ब्लेडने वार केले.
या झटापटीत दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान जयराज गायकवाड यांचा मृत्यु झाला. घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच या प्रकारणातील चार आरोपींना अटक केली असून यामध्ये वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे.
या घटनेनंतर सत्रापुर शिवारात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट दिली. सत्रापुर शिवारात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.