सामाजिक

हसत -खेळत तणावमुक्ती कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांमध्ये भरली नवऊर्जा

Spread the love

 

महावितरण कार्यप्रणालीत ग्राहकाभिमूख बदल*
_अधीक्षक अभियंता, दिपक देवहाते_

यवतमाळ,  वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन महावितरणच्या व्यवस्थापनात आणि कार्यप्रणालीत मागील १९ वर्षात अनेक बदल झाले आहे. त्यामुळे बदलानुसार कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यपध्दतीत सकारात्मक बदल केल्यास केलेल्या कामाचा आनंद होतो आणि त्या कामाचा ताणही येत नाही असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता, दिपक देवहाते यांनी केले.

महावितरणच्या ६ जून या वर्धापन दिनानिमित्त (दि. १३ जून) समर्थ प्राईड येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे येथील ताण तणाव या कार्यक्रमाचे प्रसिध्द व्याख्याते अशोक देशमुख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, कार्यकारी अभियंते संजय खंगार, संजय आडे, ब्रजेश गुप्ता, अशोक वाठ, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने यांच्यासह अधिकारी अभियंते आपल्या कुटूंबासमवेत उपस्थित होते.

वीज ही अत्यावश्यक आणि विकासाच्या चक्राला गती देणारी सेवा असल्याने वीज सेवेचा संबंध सामान्यांपासून ते उदयोजकांपर्यत सर्वांशी येतो. त्यामुळे वीजपुरवठा वादळ वाऱ्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे खंडित झाल्यास, रात्र-दिवस दुरुस्तीचे काम करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तसेच वीज हे चुकीला माफी नसलेले क्षेत्र असल्याने कर्मचाऱ्यांना येणारा ताण कसा घालवावा आणि कामाप्रती उत्साह कसा वाढवावा यासाठी प्रसिध्द व्याख्याते श्री. अशोक देशमुख, पुणे यांचे “हसत खेळत तणावमुक्ती” या कार्यक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांना नवऊर्जा देण्यात आली.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना ताण-तणावातून विरंगुळा मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांचा सहभागाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय आपसात स्नेहभाव वृध्दींगत व्हावा यासाठी व्हॉलीबॉल, क्रीकेट, चेस अश्या विविध स्पर्धाचे आयोजन करून विजेत्यांचा अधीक्षक अभियंता यांच्या हस्ते सन्मांनही करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता पुसद संजय आडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्नेहल बडे व विनोद गायकवाड या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रिय स्तरावर महावितरणचे टेनिस आणि कुस्तीत नावलौकीक मिळविल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्तुती राहूल ठाकरे, पार्थ घनजोडे, सोहम ढोक आणि सोनल चव्हाण यांनी क्रिडा क्षेत्रात, तर प्रचेता नरेंद्र राऊत, अनुजा प्रकाश कोळसे आणि भुपेश गेडाम या कर्मचारी पाल्यांनी शिक्षण क्षेत्रात मिळविलेल्या विशेष प्राविण्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधूसुदन मराठे यांनी केले, कार्यक्रमाला एका सुत्रात बांधण्याचे काम मांगीलाल राठोड, स्मिता रामटेकर, अतुल बोकाडे, प्रकाश कोळसे यांनी केले आणि आभार कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम चव्हाण यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close