मोटर सायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
राष्ट्रीय महामार्गाने घेतला पुन्हा एकाचा बळी
खैरलांजी येथील घटना
भांडरा /सिहोरा : कला शाखेची परीक्षा देण्यासाठी तुमसरला जात असताना भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील खैरलांजी गावांचे शेजारी दोन मोटारसायकलची आमनेसामने जोरदार धडक झाली. यात १७ वर्षीय तरुणांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्या ची ही घटना काल सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
मनीष निशांत डहाट रा गोंडीटोला असे मृतक तरुणाचे नाव आहे. मनिषच्या अपघाती निधनाने गावात शोककळा पसरली आहे. पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्याने बळी घेतला आहे.
🔹 भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. खड्डे बुजविण्याचे कामे करण्यात आले आहेत. परंतु मार्गाचे कार्पेट करण्यात आले नाही. रास्ता रोको आंदोलनात तुमसर ते बपेरा पर्यंत महामार्गाचे दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलन कर्त्यांनी लावून धरली होती. परंतु आश्वासन देऊन अधिकारी मोकळे झाले आहेत. महामार्गाची पुर्णतः दुरुस्ती करण्यात आली नाही. महामार्गाला खिंडारी पडल्या असल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. दुचाकी या खिंडारीमुळे महामार्गावर आदळत आहेत. खड्ड्यातून बचाव करण्याचे प्रयत्नात अपघात वाढले आहेत. महामार्गाचे दुरुस्ती करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला होता. परंतु या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात आले नाहीत. महामार्गावरील खड्ड्याने पुन्हा एक तरुणांचा बळी गेल्याचा प्रकार काल सोमवारी दुपारी १२ वाजता खैरलांजी गावांचे शेजारी भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. कला शाखेत शिक्षण घेत असलेला गोंडीटोला येथील मनीष निशांत डहाट हा तरुण स्वतः चे मोटारसायकल एम एच ३१ डी एफ ५७७१ ने तुमसरच्या दिशेने निघाला. खैरलांजी गावांचे शेजारी तुमसरहुन येणाऱ्या दुचाकीने आमनेसामने जोरदार धडक दिली. मनीष हा प्रॅक्टीकल परीक्षा देण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. मनिषच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला भंडारा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मावळली. गावात उमद्या तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोहचली असता गावकऱ्यांनी त्याचे घराकडे धाव घेतली आहे. मनिषच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याने आई आणि बहिणीची जबाबदारी खांद्यावर घेत स्वतः ला सावरले. वडिलोपार्जित किराणा दुकान असल्याने त्याने दुकानात लक्ष घातले, सोबत त्याने शिक्षणही सुरू ठेवले. उच्च शिक्षणासाठी बहिणीला तुमसरातील विद्यालयात घातले. दुकान आणि शाळा असे त्याची दिनचर्या झाली. बालपणात वडील गेल्याची कमतरता भासू दिली नाही. सकाळी दुकान आणि दुपारी कॉलेजात जात असे. परंतु नियतीला हे मान्य नसावे. आज सोमवारी त्याचा दुर्दैवी अपघातात जीव गेला आहे. आईचा एकुलता एक मुलगा गमावल्याने दुःखाचे डोंगर कोसळले आहे. राष्ट्रीय महामार्गाने आणखी किती बळी घ्यावे असा सवाल उपस्थित होत आहे. तुमसर पोलीस ठाण्याचे हद्दीत ही घटना घडली असल्याने तपास तुमसर पोलीस करीत आहेत. विरुद्ध दिशेने दुचाकीने येणारा तरुण आरंभा ( मध्यप्रदेशात ) येथील असल्याची माहिती मिळाली असून तुमसरच्या दवाखान्यात उपचार घेत आहे. त्याचे पायाला दुखापत झाली आहे. तुमसर येथे भावाला सोडण्यासाठी आला होता. यानंतर गावाकडे
परत जात असताना हा अपघात झाला आहे.
🔹 डहाट कुटुंबियांतील तीन तरुण गेले.:- गोंडीटोला गावात १० घरांचे डहाट कुटुंब आहेत. गत वर्षात मध्यप्रदेशातील कटगी येथे दुचाकी आणि पिकअप वाहनांचे धडकेत गौरव अनिल डहाट (२०) या तरुणांचा मृत्यू झाला आहे. तो आईवडीलाना एकुलता एक होता. यानंतर गत ऑक्टोबर २०२३ महिन्यात आजाराने अभिषेक मनोज डहाट ( २१ ) या तरुणांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक सुध्दा आईवडीलाना एकुलता एक मुलगा होता. मनिषचा अपघाती मृत्यू झाला असल्याने डहाट कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मनिषही आईवडीलाना एकुलता एक होता. त्याचे मागे आई आणि बहीण आहे. त्याचे पार्थिवावर सुकळी नकुल येथील वैनगंगा नदी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.