वाढदिवस ठरला मरण दिवस ; बिलावरून वाद झाल्याने हॉटेल चालकाने केली युवकाची हत्या
संभाजी नगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
डोंगरगाव फाट्याजवळ आढळलेल्या मृतदेहा मागील सत्य बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या तरुणाचा मृतदेह सापडला त्याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. जेवणाच्या बिलावरून तरुण आणि हॉटेल मालकांत वाद झाल्यावर हॉटेल मालकाने कुक च्या साह्याने तीक्ष्ण अवजाराने वार करून युवकाची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे.
संतोष जादुसिंग बमनावत (वय 28 वर्षे, रा. वांजोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर संकेत अनिल जाधव (वय 21 वर्षे, रा. भीमनगर, भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर ह. मु. स्नेहनगर सिल्लोड), गजानन यादवराव दणके (वय 24 वर्षे रा. चिंचोली नकीब ता. फुलंब्री) असे आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी डोंगरगाव फाट्याजवळील हॉटेल गारवा समोरील पाण्याच्या पाटात तरुणाचा मृतदेह काही नागरिकांना आढळून आला होतं. नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांनी दिली. तर याबाबत माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, तरुणाच्या डोक्यावर, हातावर तीष्ण हत्यारे वार केल्याचा जखमा दिसून येत होत्या. यामुळे खून झाल्याची खात्री पोलिसांना झाली.त्यानुसार पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सुरवातीला तरुणाची ओळख पटवली. दरम्यान आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (5 मे) या तरुणाचा वाढदिवस होता. तर वाढदिवस साजरा करुन मित्रांसोबत हॉटेल समर येथे त्याने पार्टी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मित्रांना विश्वात घेत माहिती काढली. यात हॉटेल चालक व तरुणामध्ये बिलावरुन वाद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ संबधित हॉटेल चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. दरम्यान, हॉटेल चालकाने कुकच्या मदतीने या तरुणाचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याचे समोर आले. तर आरोपींनी गुह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तरुणाचा भाऊ गोवर्धन जादुसिंह मनावत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवस ठरला मरण दिवस –
संतोष बमनावत हा भवन येथील नॅशनल गॅरेजवर गेल्या सहा वर्षांपासून कामाला होता. तो दररोज गावाकडून ये-जा करीत होता. दरम्यान शुक्रवारी त्याने मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. यानंतर हॉटेल समरवर त्यांनी पार्टी केली. मात्र यावेळी बिल देण्यावरून त्याचा हॉटेल चालकासोबत वाद झाला होता. तर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे शुक्रवारी संतोषचा वाढदिवस त्याच्यासह मित्र, नातेवाईकांसाठी अखेरचा ठरला.