मालेगाव / नवप्रहार डेस्क
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सिमा संपली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ लढत आहे. महायुती ने 288 जागांपैकी 286 जागांवर उमेदवार दिले आहेत.पण शिवडी आणि मालेगाव मतदार संघातून महायुती ने उमेदवार दिले नाही. शिवडीमध्ये मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने उमेदवार दिला नसल्याचं बोललं जातंय, पण मालेगाव मध्य मधून उमेदवार का दिला गेला नाही? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय आहे मालेगाव मध्यचं गणित?
मालेगाव मध्य मतदारसंघांमध्ये जवळपास 99 टक्के मुस्लिम मतदार आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देतात. या निवडणुकीत मालेगाव मध्य मधून समाजवादी पार्टीकडून शाने हिंद, एमआयएमकडून विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल, काँग्रेसकडून एजाज बेग आणि अपक्ष माजी आमदार आसिफ शेख असे चार उमेदवार आहेत.
या मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. महायुतीमध्ये ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला होती, मात्र त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता, म्हणून त्यांनी उमेदवार उतरवला नाही.
लोकसभेत भाजपला मोठा फटका
मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात येतो. धुळे लोकसभेत येणाऱ्या 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना आघाडी मिळाली होती, पण मालेगाव मध्य मतदारसंघातून मिळालेल्या आघाडीने काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांचा विजय झाला.
लोकसभा निवडणुकीत शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्यमधून 1,98,869 मतं मिळाली होती, तर भाजपच्या सुभाष भामरे यांना याच मतदारसंघांतून फक्त 4542 मतं मिळाली होती. मालेगाव मध्य मधून मिळालेल्या आघाडीच्या जोरावर शोभा बच्छाव यांनी सुभाष भामरे यांचा 3,831 मतांनी पराभव केला होता.