भोंदू बाबा कडून तरुणीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न ; पोलिसांनी केली अटक

डोंबिवली / विशेष प्रतिनिधी
धावपळीचे जिवन , आकस्मिक उद्भवणाऱ्या समस्या , वेळेवर झालेल्या दुर्धर आजाराचे निदान त्यावर होणारा अमाप खर्च यामुळे आज जवळपास प्रत्येक घरातील शांती आणि समाधान लोप पावत असल्याचे दिसून येत आहे. त्यात वाढती महागाई , मुलांचे शिक्षण यामुळे आर्थिक चणचण देखील भासत आहे. या कारणाने कुटुंबातील महिला वर्गाला कुटुंबावर करणी- टोटका , भूतबाधा केल्याची शंका येते. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या मग भोंदूबाबाच्या कचाट्यात सापडतात. आणि मग भोंदूबाबा त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण करतो. तुरळक अश्या महिला असतात ज्या अश्या भोंदूबाबा च्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतात.
अशीच घटना एका तरुणी सोबत घडली आहे. बाबाच्या कचाट्यातून पळ काढलेल्या तरूणीने खडकपाडा पोलिसांपुढे बाबाचे खरे रूप आणले. महिला, अबला आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सद्याची परिस्थिती पाहता पोलिसांनी तातडीने बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला गजाआड केले आहे.
अरविंद जाधव (50) असे अटक करण्यात आलेल्या भोंदाड बाबाचे नाव असून कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या परिसरात या बाबाचा जथ्था आहे. कवटी, खोपडी, हाडे, कवड्या-हाडांच्या माळा, नारळ लिंबे, धूप, अगरबत्त्या आदी तंत्र मंत्रांच्या वस्तूंनी भरलेल्या या जथ्थावर अनेक पीडित समस्या सोडविण्यासाठी जात असतात. करणी, भानामती, भूतबाधा, प्रेतबाधा, आजारपण, कौटुंबिक कलह, वशीकरण, नोकरी, धंद्यातील अपयश, विवाह, वैवाहिक ताण-तणाव यासारख्या समस्या आपण सोडवू शकतो, अशी अलिखित जाहिरातबाजी करत या बाबाने गेल्या काही महिन्यांपासून आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे बाबाची कीर्ती वाढत सर्वदूर पसरली आहे.
…अन् तरुणीने ताडकन् दरवाजा उघडून खोलीबाहेर पळ काढला
या भागातील अशीच एक तरूणी तिच्या घरात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या आशेने बाबाकडे गेली. या बाबाने तरूणीच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचे अमिष दाखविले. तरूणी सोबत तिचे घरचे लोकही होते. बाबाने घरच्यांना बाहेरच्या खोलीत बसण्यास सांगितले आणि एकांतात धूप-दीप-पूजा करायची असल्याची थाप मारून तरूणीला आतल्या खोलीत नेले. तू आणि तुझ्या घरच्यांवर कुणीतरी काही केल्याचे मला दिसत आहे. पुढे खूप संकटे येतील, असे सांगून बाबाने तरूणीला घाबरवले. हे सर्व सांगत असतानाच बाबा तिच्या सर्वांगावर हात फिरवत होता. याची तरूणीला जाणीव होऊ लागली. बाबा समस्या सोडविण्याऐवजी आपल्याशी लैंगिक चाळे करत असल्याची खात्री पटल्यानंतर तरूणीने ताडकन् दरवाजा उघडून खोलीबाहेर पळ काढला. सारा प्रकार बाहेरच्या खोलीत बसलेल्या नातेवाईकांना सांगितला.
एकीकडे बाबागिरीच्या नावाखाली भोंदूगिरीच नव्हे तर लैंगिक शोषण करणाऱ्या बाबाला अद्दल घडवण्यासाठी घरच्यांनी पिडीत मुलीसह खडकपाडा पोलिस ठाणे गाठले. तर दुसरीकडे आपल्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच बाबाने परिसरातून धूम ठोकली.
बाबाने आपल्यासोबत केलेल्या लैंगिक चाळ्यांचा सारा प्रकार पिडीत तरूणीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्यापुढे कथन केला. वपोनि डॉ. वाघमोडे यांनी घरच्यांसह तरूणीला धीर दिला. या प्रकरणी भोंदू बाबाच्या विरोधात पोलिसांनी पिडीत तरूणीच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी बाबाचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरात घुसून तपासणी केली. तथापी बाबा कुठेही आढळून आला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिल्यानंतर बाबा तावडीत सापडला. मंगळवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वपोनि डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.