कारंजा लाड येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव उत्साहात साजरा.
कारंजा लाड / प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तांड्यामध्ये रविवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी सामकिमाता महिला मंडळातर्फे तिज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पारंपरिक बंजारा वाद्यवृंदाच्या ठेक्यावर, लोकगीत आणि लोकनृत्य करून तीज विसर्जन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ऍड. मोहिनी इंद्रनील नाईक, कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा सभापती सईताई डहाके, डॉ. निकीता चव्हाण, डॉ. श्याम जाधव (नाईक )यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारंजा येथील बंजारा कॉलोनी येथे बंजारा नाईकाच्या घरून सकाळी या उत्सवाला सुरूवात झाली. तांड्याचे नायक, कारभारी, डायसान व समस्त बंजारा बांधवांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ऍड मोहिनी नाईक यांनी समाजाच्या प्रथा परंपरा टिकल्या पाहिजेत असे आवाहन केले. तसेच भिकासिंग नायक व डॉ श्याम जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
या तीज उत्सवात शेकडो बंजारा महिलांनी सहभाग घेतला होता.