विराट कुणबी महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
गडचिरोली, / तिलोत्तमा हाजरा
कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार (ता. ५) काढण्यात आलेल्या कुणबी महामोर्चाने स्थानिक शिवाजी महाविद्यालयापासून निघून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये, महाराष्ट्रातील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी, गडचिरोली जिल्ह्यासह इतर बारा जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रांतील ओबीसींचे १७ संवर्ग पदांचे आरक्षण शून्य झाले आहे, हा अन्याय तत्काळ दूर करावा, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व शासकीय शाळांचे खासगीकरण त्वरित थांबवावे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी तत्काळ वसतिगृह सुरू करावे तसेच त्यांच्यासाठी स्वाधार योजना लागू करावी व इतर ११ मागण्यांसाठी या कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय ओबीसी महासंघासह ओबीसी प्रवर्गातील संघटना तसेच सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्तेही महामोर्चात सहभागी झाले होते. या महामोर्चाला कलार समाज संघटना, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष,धोबी समाज संघटना व इतर अनेक संघटनांनी पाठींबा जाहीर केला होता. तसेच महामोर्चाच्या स्वागतासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले होर्डींग्ज मोठ्या संख्येने लावले होते. महामोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी, कर्मचारीही आंदोलकांना सौजन्याची वागणूक देत त्यांना मदत करताना दिसले. महामोर्चापूर्वी शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या समाजबांधवांना आयोजकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. महामोर्चादरम्यान मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची तसेच अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. हा अभूतपूर्व महामोर्चा शांततेत पार पडला.
–