प्रधानमंत्री पिक विमा योजना चित्ररथाचे अंजनगाव सुर्जी मध्ये आगमन
तालुक्यात भ्रमण करुन करणार शेतकऱ्यांत जागृती
प्रभारी तहसीलदार रविंद्र काळे तसेच गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी दाखविली हिरवी झेंडी
अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे)-
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्यापक जनजागृती व्हावी तसेच या योजनेची माहिती तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनपर्यंत पोहचावी यासाठी विमा कंपनीतर्फे चित्ररथ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर अंजनगाव येथे सोमवार दिनांक दि 24 जुलै रोजी या चित्ररथाला अंजनगाव सुर्जी चे प्रभारी तहसीलदार रविंद्र काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाला मार्गस्थ केले.
यावेळी प्रचार,प्रसिद्धी साहित्याचेही अनावरण करण्यात आले.पीकविमा योजनेचा जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रभारी तहसिलदार रवींद्र काळे यांनी यावेळी बोलतांना केले.
हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित करण्यात आलेल्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. हवामान घटाकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यास होणारे नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, तसेच पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते. अशावेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमुळे विमा संरक्षणाचे कवच मिळणार आहे.
पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ ‘एक रुपया’ भरुन नोंदणी करावयाची आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांना CSC सेंटर, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. यावर्षी या योजनेची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी कृषि विभागामार्फत तसेच जिल्हा व तालुकास्तरीय पीक विमा प्रतिनिधी प्रचार व प्रसिद्धी करीत आहेत. शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचा विमा उतरवून आपले पीक संरक्षित करावे, तसेच नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान झाल्यास नुकसान ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले.
यावेळी प्रभारी तालुका कृषिअधिकारी आर तराळे,पंचायत गटविकास अधिकारी विनोद खेडकर , नायब तहसीलदार विजय भगत ,प.स.कृषि अधिकारी राठोड , मंडळ कृषि अधिकारी खेरडे , तसेच पिक विमा प्रतिनिधी अमरदिप कुकडे,तालुका पिक विमा प्रतिनिधी सुबोध धारस्कर, इतर कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते
तसेच कोणत्याही सी एस सी. सेंटर धारकांनी एक रुपया ऐवजी जास्तीची रक्कम मागितल्यास त्वरित तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी कृषी अधिकारी यांचे कडे फोन द्वारे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले